Breaking News

एनआयए आणि ईडीची पनवेल, नवी मुंबईत धाड

पनवेलमधून एकाला तर नेरूळमधील चौघे ताब्यात

पनवेल : वार्ताहर
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या नवी मुंबईतील नेरूळ येथील कार्यालयावर एनआयए व ईडीने गुरुवारी (दि. 22) पहाटे  धाड टाकली. या कारवाईत नेरूळमधून चौघांना तर पनवेलमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
एनआयए आणि ईडीने आतापर्यंत 100 सदस्यांना ताब्यात घेतले आहे. देशभरातील 10 राज्यांत एनआयए आणि ईडीने संयुक्तरित्या ही छापेमारी केली आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात छापेमारी केली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांत नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये नवी मुंबईतील नेरूळ येथील पीएफआयच्या कार्यालयात गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास छापेमारी केली आहे. त्याचप्रमाणे पनवेलमध्येसुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबईतील नेरूळमधून चार जणांना तर पनवेलमधून एकाला ताब्यात घेतले आहे.
अतिरेकी संघटना म्हणून ओळखली जाणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली आहे. असे असले तरी नेरूळ सेक्टर 23 करावेगाव या गावठाण भागात त्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी राष्ट्रीय तपास विभागाने धाड टाकल्यानंतर तब्बल सात तासांच्या तपासणीनंतर चार जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक व्यक्ती याच परिसरातील रहिवासी असल्याचेही बोलले जाते. सुमारे 50 कर्मचारी, अधिकर्‍यांचा ताफा या ठिकाणी असून कसून चौकशी करीत आहेत. तसेच तपासात आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे, मात्र याबाबत थेट प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे.
कार्यालय असलेला परिसरसात दैनंदिन गरजा भागावणारी दुकाने आहेत, मात्र या छापेमारीनंतर या कार्यालय आणि त्या ठिकाणी काम करणार्‍यांनी या कारवाईबाबत मौन बाळगले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply