रायपूर ः वृत्तसंस्था
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात थरार पाहायला मिळाला. इंग्लंड लिजंडने अवघ्या सहा धावांनी भारत लिजंडवर मात केली, पण भारताच्या इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी यांनी इंग्लंडच्या संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंड लिजंडच्या 189 धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग ही जोडी अपयशी ठरल्यानंतर भारत लिजंड संघाची अवस्था 6 बाद 99 अशी दयनीय झाली होती. भारतीय संघ हा सामना पराभूत होईल हे तेव्हाच स्पष्ट झाले होते, पण इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. इरफान व गोनी यांनी 26 चेंडूंत 63 धावांची नाबाद खेळी केली. बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवणार्या भारतीय संघाचा पीटरसनच्या नेतृत्वाखाली खेळणार्या इंग्लंड संघासमोर कस लागला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 7 बाद 188 धावा चोपल्या. 40 वर्षीय पीटरसनने 18 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 37 चेंडूंत सहा चौकार व पाच षटकारांसह 75 धावांची वादळी खेळी केली. डॅरेन मॅडीने 29 धावा केल्या. भारताकडून युसूफ पठाण याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर मुनाफ पटेल व इरफान पठाण यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना दुसर्याच षटकार वीरेंद्र सेहवाग (6) बाद झाला. त्यानंतर मॉण्टी पानेसरने भारतीय संघाला धक्के दिले. पानेसरने तेंडुलकरला चकवा देत माघारी पाठवले. पानेसरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न फसला अन् तेंडुलकरला (9) यष्टिचीत होऊन माघारी जावे लागले. मोहम्मद कैफ ( 1), एस बद्रीनाथ (8) हेही अपयशी ठरले. युवराज सिंगने 21 चेंडूंत 22 धावा केल्या, तर यूसूफला 17 धावाच करता आल्या. नमन ओझा (12) बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 26 चेंडूंत 70 धावांची गरज होती. यानंतर इरफान पठाण व मनप्रीत गोनीने दमदार खेळ केला. इरफानने 34 चेंडूंत चार चौकार व पाच षटकार खेचून नाबाद 61 धावा केल्या, तर गोनीने 16 चेंडूंत एक चौकार व चार षटकारासह नाबाद 35 धावा कुटल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज असताना भारताला 12 धावाच करता आल्या. भारताने 7 बाद 182 धावा केल्या.