पाली ः प्रतिनिधी
हिवाळ्यात पूर्व युरोप व पूर्व इराण देशांतून जवळपास 7000 किमीचा प्रवास करून काळ्या डोक्याचे भारीट पक्षी कोकणात येतात आणि हिवाळा संपला की आपल्या मूळ ठिकाणाकडे हळूहळू परततात, मात्र उन्हाळा सुरू झाला तरीही हे पक्षी थव्याने जिल्ह्यातील विविध ठिकाणी वावरताना पक्षी अभ्यासकांना दिसत आहेत. मुबलक खाद्य व पोषक हवामानामुळे हा बदल झाल्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
भारीट पक्षी थव्यात आढळतात व गवताळ प्रदेशात जमिनीवरील बिया खातात. ते धान्य व बियाणांच्या शोधात कळपात उडताना दिसताहेत. सुधागड, नांदगाव, विळे, सणसवाडी व बेडगाव भागात सध्या हे पक्षी गवताळ रानात थव्याने दिसतात. भातशेत किंवा सपाट भागात मनमोहक आवाज काढत ते गवताच्या बिया, धान्य खाण्यासाठी शेतात उतरतात. सध्या भातशेतात लावलेला वाल किंवा पावटा खाण्यासाठीही हे पक्षी शेताच्या अवतीभोवती दिसतात. जांभळी मंजिरी बहरून गेल्यावर त्या जांभळ्या मंजिरीच्या बिया खाण्यासाठी हे पक्षी उतरत आहेत, असे येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षक राम मुंढे यांनी सांगितले.
बदलते हवामान व स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी स्थलांतर करतात. हिवाळ्यात भारतात पक्ष्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते, पण भारीटचा मुक्काम सध्या तरी लांबलेला दिसतोय. जेव्हा जंगलात वणवे लावण्याचे प्रमाण वाढते, तेव्हा काही सखल भागातील वाढलेले उंच गवत जळून खाक होते. त्यामुळे त्या गवताच्या बिया किंवा धान्य उदरनिर्वाहासाठी मिळत नाहीत. अशा वेळी या स्थलांतरित पक्ष्यांची उपासमार होऊन ते पुन्हा या भागात येत नाहीत.
मागील महिन्यात वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांना माणगाव तालुक्यात भातशेतीच्या परिसरात हजारोंच्या संख्येने बसलेले भारीट पक्षी आढळले. जंगलात, माळरानावर किंवा शेतात मोठ्या संख्येने भारीट बसलेले पाहिले आहेत, मात्र वणव्यांमुळे हे स्थलांतरित पक्षी इतरत्र जाण्याची भीती आहे. त्यामुळे वणवे थांबविण्याबाबत जनजागृती झाली पाहिजे, असे येथील स्थानिक पक्षीप्रेमी ओंकार नलावडे यांनी सांगितले.