खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री (दि. 21) मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात घडले. पहिल्या अपघातात टँकरचालक पुण्याहून मुंबईकडे जात असताना टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर महामार्गावर पलटी झाला. ही घटना खोपोली एक्झिटजवळ रात्री 9.30च्या सुमारास घडली. सुदैवाने अपघातात वाहनचालक बचावला. कंटेनर महामार्गावर पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
रविवारी रात्री 9.45च्या सुमारास आडोशी गावाजवळ ट्रकचा दुसरा अपघात झाला. ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात असताना अज्ञात वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. या धडकेत वाहनचालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले असून, ट्रकच्या पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकाच वेळी दोन अपघात झाल्यामुळे कर्मचार्यांची तारांबळ उडाली. डेल्टा फोर्स, अपघात मदत टीम, महामार्ग पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी पोहचून महामार्गावर मोठ्या प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.