Breaking News

परीक्षेचा हव्यास

गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती, तेव्हा 60 वर्षे वयाच्या वरील व मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांना प्रचंड त्रासास तोंड द्यावे लागले होते. सध्या आलेल्या दुसर्‍या लाटेत मात्र लहान मुले, शाळकरी विद्यार्थी व तरुण वर्ग भरडला जात आहे असे दिसून येते. ही अतिशय गंभीर बाब असून गेल्या आठवडाभरात अनेक तज्ज्ञ तसेच आरोग्यमंत्र्यांनीही त्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाचे त्याकडे पुरेसे लक्ष आहे असे दिसत नाही.

सारा महाराष्ट्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी प्राणपणाने झुंजतो आहे, तेव्हाच बिलकुल आवाज नसलेला एक वर्ग निमूटपणे पुस्तके उघडून बसला आहे. हा आहे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा शाळकरी वर्ग. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा यापूर्वीच जाहीर झाल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी या परीक्षांच्या हॉल तिकिटांचे वाटप करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत असेही समजते. एकंदरीत कुठल्याही परिस्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायच्याच असा चंग राज्य सरकारने बांधलेला दिसतो. दहावी-बारावीच्या परीक्षा किती महत्त्वाच्या असतात हे वेगळे सांगायला नको. त्या परीक्षांतील निकालावर विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक कारकीर्द ठरू शकते. आपला मुलगा किंवा मुलगी विज्ञान शाखा, कला शाखा, वाणिज्य शाखा यापैकी कुठल्या शाखेचा अभ्यास करणार की एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम निवडणार याची दिशा या दोन्ही परीक्षांच्या निकालांवर ठरते. खरे सांगायचे तर, आदर्श शिक्षण व्यवस्थेत अशा दोन परीक्षांवर संपूर्ण आयुष्य अवलंबून ठेवणे योग्य मानले जाता कामा नये. आपला कल आणि गुणवत्तेनुसार विद्यार्थ्याला स्वत:चे भविष्य घडवण्याची संधी मिळायला हवी. परीक्षा हे त्याचे एक माध्यम तेवढे असू शकते. सध्याच्या काळात दहावी-बारावीच्या परीक्षांना नको इतके महत्त्व आले आहे. हे महत्त्व कमी करावयाचे असेल तर शैक्षणिक धोरणातच आमूलाग्र बदल करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची पावले त्या दिशेने नक्कीच पडत आहेत. परंतु सध्या प्रश्न आहे तो कोरोना संकटामध्ये कात्रीत सापडलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा. कोरोनाची दुसरी लाट चौपट वेगाने महाराष्ट्रावर येऊन कोसळली आहे. राज्यात रोज जेवढे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, जवळपास तेवढेच फ्रान्स या देशामध्ये आढळून येत आहेत. फ्रान्समध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असून तेथे तिसर्‍यांदा लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. महाराष्ट्रात रुग्ण दुप्पटीचा कालावधी कमालीचा घटला असून मृत्यूदर देखील वाढीस लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे मार्च महिन्यात शाळकरी मुलांना मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झाल्याचे राज्याची ताजी आकडेवारी सांगते. यातील बहुतेक मुले शाळा-कॉलेजांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत हे उघड आहे. या कोरोनाबाधित विद्यार्थ्यांमधील किती जण दहावी किंवा बारावीच्या परीक्षांना बसणार आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही. एकीकडे कोरोनाशी लढावयाचे व त्याचवेळेस तोंडावर आलेल्या परीक्षेचा अभ्यास करायचा अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या विद्यार्थी वर्गाकडे कुणी सहानुभूतीने पाहणार आहे का? सध्याच्या बिकट परिस्थितीत परीक्षेचा अट्टहास करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य प्राधान्यक्रमाने लक्षात घेऊन परीक्षेबाबत अन्य काही पर्याय शोधणे इष्ट ठरेल. विद्यार्थी हे देशाचे भविष्य मानले जातात. ते भविष्य टिकवण्यासाठी परीक्षांचा हव्यास तूर्त तरी सोडायला हवा असे वाटते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply