Breaking News

मालमत्ता कर अभय योजना जाहीर झाल्याने नागरिकांनी मानले परेश ठाकूर यांचे आभार

पनवेल : प्रतिनिधी

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मागणी केल्याप्रमाणे पनवेल शहरातील पूर्वाश्रमित नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली आहे. पनवेल शहरातील ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे त्यांच्यासाठी ही मालमत्ता कर अभय योजना आहे. ही योजना जाहीर झाल्याने अनेक नागरिकांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

पनवेल महापालिकेने मालमत्ता कराची वसुली करण्यास सुरुवात केल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 24 मार्च 2021 रोजी आयुक्तांना पत्र लिहून कोरोनामुळे अनेक नागरिकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, तर काहींच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यातच पुन्हा कोरोना वाढीस लागल्याने नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरणे शक्य होत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीचा विचार करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर भरण्याची मुदत वाढवून 30 एप्रिल 2021 करावी आणि शास्ती अभय योजना सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिल्याने ज्यांनी अजूनही मालमत्ता कर भरला नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

पनवेल महापालिका हद्दीतील मालमत्ता करावर 2020-21 या वर्षापर्यंत लावण्यात आलेल्या मालमत्ता करावरील व्याज/ दंड/ शास्ती येत्या 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण कर भरल्यास 50% सवलत/माफी देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत कर भरणा केल्यास 25% सवलत/ माफी देण्यात आली आहे, तसेच संपूर्ण मालमत्ता कर (शासन कर वगळून) एकत्रित भरल्यास नियमानुसार पाच टक्के व ऑनलाइन कर भरणा केल्यास अतिरिक्त दोन टक्के सूट देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, त्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घ्यावा!

कोरोनामुळे मार्च 2020पासून लॉकडाऊन जाहीर केल्याने पनवेलमधील अनेक व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. रोजी-रोटी नसल्याने नागरिकांना मालमत्ता कर भरता आला नाही. त्यावर उशीर झाल्याने दंड आकारण्यात आला होता. आता पुन्हा कोरोना वाढत असल्याने लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने नागरिकांना मुदतवाढ आणि शास्तीमध्ये सवलत देण्याची मागणी करण्यात आली. ती मंजूर झाल्याने ज्या नागरिकांनी मालमत्ता कर काही कारणासाठी भरलेला नसेल त्यांनी या अभय योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मागणी केल्याने महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता नागरिक थकबाकी भरू शकतील त्याचा फायदा भविष्यात विकास योजना राबविण्यासाठी होईल. -अजय बहिरा, नगरसेवक

कोरोना लॉकडाऊनमुळे आमचे व्यवसाय बंद होते. बँक हफ्ते, वीज बिल आणि मुलांची शाळेची फी भरणेही अवघड झाले होते. त्यामुळे मालमत्ता कर भरणे शक्य झाले नव्हते. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मागणी केल्याप्रमाणे महापालिकेने अभय योजना जाहीर केल्यामुळे आता आम्हाला कर भरणे शक्य होईल. त्यांचे आम्ही आभारी आहोत. -एक व्यावसायिक

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply