पाली ः प्रतिनिधी
पाली गावाचा पाणीप्रश्न कायमच गंभीर समस्या बनून राहिली आहे. पाली गावाला पाणीपुरवठा करणार्या अंबा नदीचे पाणी जलप्रदूषणामुळे दूषित होत असल्याचे समोर येत आहे. सुधागड तालुक्यातील वाढते जलप्रदूषण आणि रासायनिक कंपनीमधून टाकऊ रसायन हे थेट अंबा नदीत सोडल्यामुळे पिण्यायोग्य पाणी हे पूर्णतः दूषित होत आहे. अंबा नदीच्या पाण्यावर दोन-तीन दिवसांपासून रसायनयुक्त लालसर तवंग आला आहे. यामुळे पालीकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच जैवविविधतेलादेखील धोका निर्माण झाल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण दिसून येत आहे.
अनेकदा पालीतील घरांना पाणीपुरवठा करणार्या नळातून साप बाहेर आले होते, मात्र आता दुर्गंधीयुक्त पाणी पालीकरांच्या वाट्याला येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड तालुक्यात पाली, राबगाव, आंबोले, रासळ, कासनळ, हेदवली, जांभूळपाडा या गावांजवळच अंबा नदीच्या काठावर अनेक रासायिक कंपन्या उभा राहिल्या आहेत. या कंपन्यांतील निघणारा दूषित वायू, तसेच उत्पादनानंतर टाकण्यात येणारे टाकाऊ दूषित केमिकलयुक्त रसायने यामुळे अंबा नदीचे पाणी दूषित होत आहे. काही कंपन्यांकडे टाकाऊ रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा नसल्याचे दिसून येते. यामुळे या कंपन्यांतील दूषित रसायनयुक्त पाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. यामुळे तालुक्यातील अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणार्या लोकांचे जनजीवन धोक्यात आले आहे. आजमितीस हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने लोक, जनावरे यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे.
अंबा नदीच्या आजूबाजूला असणार्या कंपन्यांमधून रात्रीच्या वेळेला रसायनयुक्त सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. दिवसभर या कंपन्यांकडून कार्बन डायऑक्साइड प्रदूषित धूर हवेत सोडला जातो. हा सोडला जाणारा धूर प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या नाकातोंडात जात असल्यामुळे प्राणी-पक्षी यांची प्रकृती बिघडत आहे. अंबा नदीवरील पाण्यावर अवलंबून असलेले नागरिक व वन्यप्राणी यांच्या आरोग्याविषयी वन विभाग व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांनी झोपेचे सोंग घेतले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांकडून या विभागाविषयी तीव्र संताप्त व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील ज्या कंपन्यांकडून वायू व जलप्रदूषण करण्यात येत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई संबंधित विभागांनी लवकरात लवकर करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
पालीला पुरविण्यात येणार्या अंबा नदीच्या पाण्यामुळे आरोग्यविषयीच्या अनेक तक्रारी जाणवत आहेत. नागरिकांना नायटा, खरूज, गजकर्णसारखे आजार होताहेत. संबंधित विभागाने कंपन्यांवर कारवाई करावी.
-बशीर परबळकर, ग्रामस्थ, पाली
सुधागडातील अंबानदीचे पाणी दूषित करणार्या कंपन्यांवर वनविभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल. तालुक्यातील वन्यप्राण्यांचे जीवन यावर अवलंबून आहे. दूषित पाण्यामुळे त्यांचे हाल होत असतील तर रासायनिक कंपन्यांवर वनकायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. -समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, सुधागड-पाली
पाली शहरासाठी अंबानदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो, परंतु केमिकल कंपन्यांमुळे अंबानदीचे पाणी दूषित होत असेल तर संबंधित कंपन्यांवर ग्रामपंचायतीकडून कडक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित कंपन्यांना नोटिसाही पाठविण्यात येतील. -गणेश बालके, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पाली