- विशेष अधिवेशन बोलवा
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
मुंबई ः प्रतिनिधी
कोरोना आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन ते तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते शुक्रवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय आणि नियंत्रणाचा अभाव असल्याने राज्यातील कोरोना परिस्थिती बिकट झाली असल्याची टीका या वेळी दरेकर यांनी केली. राज्यात अनेक लसीकरण केंद्रांवर बोजवारा उडाला आहे. योग्य समन्वय आणि नियंत्रणाच्या अभावातूनच हे झाले आहे. त्यामुळे केंद्राने कमी दिले असे म्हणण्यात काही अर्थ नाही, असे दरेकर म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अहंकाराची भावना असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी. त्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री वाट का पाहत आहेत, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारने केंद्र सरकारशी सलोख्याचे वातावरण ठेवले तर कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी जास्त मदत मिळेल, असा दावा काही दिवसांपूर्वीच दरेकर यांनी केला होता. आताही राज्य सरकार केंद्रावर टीका करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता दरेकर म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत राजकारण करणे दुर्दैवी आहे. अशा संकटकाळात कोणीही राजकारण करू नये, परंतु महाराष्ट्रातील सरकार प्रत्येक वेळेला अपयश झाकण्यासाठी केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे.