मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता 4 एप्रिलपासून राज्य सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध 1 मे रोजी सकाळी 7 वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती, पण राज्यात लागू असलेले निर्बंध 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू करण्यात आल्यानंतर आता 15 मेनंतर लॉकडाऊन वाढणार का संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आतादेखील रोज 55 हजार ते 60 हजार नव्या रुग्णांची नोंद होत आहे. राज्यातील पॉझिटिव्हीटी रेट हवा तेवढा कमी होताना दिसत नाही. 36 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, पण अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये संख्या कमी आहे, तर काही ठिकणी स्थिर असून, काही जिल्ह्यांत वाढत आहे.’ टोपे पुढे म्हणाले, जिल्ह्यांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. येत्या 15 तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे 15 तारखेच्या दरम्यान लॉकडाऊन वाढवायचा की संपवायचा निर्णय घेण्यात येईल.