मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील लसीकरणावरून महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी तर शिवसेनेला आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का, असा सवाल केलाय. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आणि शिवसेनेत यांच्यातील वाद पुन्हा उभारून आला आहे. काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना नेते व महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांना धारेवर धरले आहे. ‘वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मी या मतदारसंघाचा स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहे. तरीही प्रोटोकॉलनुसार मला या कार्यक्रमाला निमंत्रित केले नाही. आता शिवसेना लसीकरणावरही राजकारण खेळणार आहे का’ असा सवाल सिद्धिकी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, आमदार झिशान सिद्धिकी यांच्या आरोपावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप आमदार राम कदम म्हणाले की, आम्ही नाही तर महाराष्ट्र सरकारमध्ये भागीदारी असलेले काँग्रेस पक्षाचे नेते सांगतायेत ठाकरे सरकार लसीकरणावरही राजकारण करीत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काँग्रेसला कसे लाचार बनवले आहे हे राहुल गांधींनी बघावे. तुमचा पक्ष सर्वांसमोर अपमानित होत आहे. काय दिवस आलेत, असा टोलाही कदम यांनी लगावला आहे. मनसेचे अखिल चित्रे म्हणाले की, मी अशा मतदारसंघात आहे जिथे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत लढले. नंतर महाविकास म्हणत एकत्र आले, मात्र एकत्र येऊनसुद्धा आता मतदारसंघात दोघे एकमेकांना काम करू देत नाहीत अशी रडारड सुरू आहे. या मतदारसंघाचे हे दुर्दैव आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper