अलिबाग ः प्रतिनिधी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाने देशाच्या दक्षिण किनारपट्टीपासून ते कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. हे वादळ गुजरातकडे जाणार असून या मार्गातील रायगड जिल्ह्यालाही त्याचा तडाखा बसणार आहे. मागील वर्षाचा निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव असल्यामुळे रायगडकरांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून 2254 जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. ‘तौत्के’चा काहीसा परिणाम रविवारी (दि. 16) जिल्ह्याच्या सर्वच भागांत पाहायला मिळाला. शनिवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ही वादळापूर्वीची शांतता आहे याची कल्पना असल्यामुळे रायगडकर दहशतीच्या वातावरणात होते. दुपारनंतर वातावरण हळूहळू बदलू लागले. मध्येच काही ठिकाणी पावसाची रिपरिप होत होती. मध्यम स्वरूपात वारे वाहत होते. ही वार्याची झुळूकही वादळाची भीती निर्माण करणारी होती. लॉकडाऊनमुळे रस्त्यावरही किरकोळ वाहने होती. अतिवृष्टी व वार्यामुळे घरांची पडझड होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड, उरण, महाड तालुक्यांतील 2254 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. समुद्र किनार्यावर 62 व खाडी किनार्यावरील 128 गावांना सतर्क करण्यात आले आहे. तेथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. झाडे पडून वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून पडलेली झाडे हटविण्यासाठी पथके तैनात करण्यात आली. 128 वूड कटर्स तयार ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह चार राज्यांवर तौत्के चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. कोकणात रत्नागिरीत शनिवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. देवभूमी केरळलाही वादळी वार्यासह पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. केरळमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे रस्त्यांवर उन्मळून पडल्याने जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. वादळाचा रोख गुजरात, दमण-दिव व दादरा-नगर हवेलीच्या दिशेने असला तरीही कोकण व किनारी भागांत प्रभाव दिसत आहे. कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाने रविवारी पहाटेपासून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्याची तीव्रता वाढली असून रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या. राजापूर तालुक्यातील आंबोळगडसह 365 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 16 व 17 मे या दोन दिवशी रत्नागिरीच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडक देणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला. या कालावधीत वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली व मंडणगडसह पाच तालुक्यांना तडाखा बसण्याची शक्यता आहे. या वादळामुळे कच्ची, पत्र्याची घरे, गुरांचे गोठे यांची पडझड होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. समुद्रावरून येणार्या वार्याचा वेग ताशी 60 ते 70 किमी असल्याने किनारपट्टी भागातील झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. हे चक्रीवादळ ताशी 10 किमी वेगाने उत्तरेकडे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाची तीव्रता वाढली. ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कुणकेश्वर व देवगड किनारपट्टीला फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ताशी 120 ते 150 किमी वेगाने वारे वाहत आहेत. ‘तौत्के’ कोकण किनारपट्टीला समांतर पुढे गुजरातकडे रवाना होईल. रविवारी सकाळी वेंगुर्ले किनार्याजवळून याचा प्रवास सुरू झाला. रत्नागिरीच्या हद्दीत सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान राजापूर, आंबोळगड, सागवे, साखरीनाटे परिसरातून ते प्रवेश करेल. सोमवारी (दि. 17) पहाटे 4 ते 5 या कालावधीत ते दापोली, मंडणगडच्या किनार्यावरून पुढे रवाना होण्याचा अंदाज विंडी वेबसाइटने वर्तविला आहे.
25 बोटी आश्रयासाठी दिघी बंदरात
रायगडातील मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या 96 नौका समुद्रकिनारी पोहचल्या. दिघी बंदरात मुंबई शहर, मुंबई उपनगरातील 25 बोटी आश्रयासाठी आल्या. परप्रांतीय नौका येथे आल्या नसल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभाग सहा. आयुक्त सुरेश भारती यांनी दिली आहे.
कर्नाटकात चौघांचा मृत्यू
तौक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला असून सहा जिल्ह्यांतील 73 गावांना या वादळाचा फटका बसला आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आढावा
बैठक चक्रीवादळाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांनी गुजरात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांची आढावा बैठक घेतली.