खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गाला लागून पेपको कारखान्याच्या मोकळ्या जागेत गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेला खोपोली महोत्सव या कार्यक्रमाची जागा वादाच्या भोवर्यात सापडल्याने सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला लागूनच असलेल्या पेपको कंपनीच्या मोकळ्या जागेत खोपोली महोत्सव सुरू आहे. त्यासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या स्टॉलची दालने, आकाश पाळणे व इतर करमणूकीची साधने उपलब्ध केली आहेत. रविवारी (दि. 3) रात्री या महोत्सवाला आलेल्या नागरिकांनी आपली वाहने महामार्गावरच उभी केल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
सध्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे, हे शासनाच्या संबंधित विभागाला माहीत असतानाही, अशा जागेत महोत्सवाला परवानगी कुठल्या अटीवर देण्यात आली आहे, असा प्रश्न खोपोलीकरांना पडला. या परवानगीबाबत स्थानिक पोलीस आणि नगरपालिका प्रशासन एकमेकांकडे बोटे दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांच्याशी संपर्क साधला असता, रजेनंतर आपण आजच कामावर रुजू झालो आहोत. खोपोली महोत्सवाच्या आयोजनाबाबत निश्चितच चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महोत्सवाच्या परवानगीबाबत आम्ही आयोजकांकडून कागदपत्रे मागविले आहेत, ती तपासल्यानंतर या महोत्सवाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येईल. – अनुप दुरे, मुख्याधिकारी,खोपोली नगर परिषद