मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केलाय. आरक्षणाचा मुडदा पाडून ते मातीमोल केले, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला, तसेच महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडले याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 16) पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील व श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. रविवारी समितीची पहिली बैठक झाली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आले होते. हायकोर्टातही हे आरक्षण टिकविले होते आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळू दिली नाही, पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला. मुडदा पाडला, माती केली, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. याचबरोबर मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहोत. या आंदोलनात आमचा झेंडा राहील, पण पक्षाचे नाव राहणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याशिवाय मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्यानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.