Breaking News

शिस्तीने प्रयासांना साथ देऊ

मोदींनी मंगळवारी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने आपली नवी नियमावली बुधवारी जाहीर केली. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये

20 तारखेपासून निर्बंध शिथिल करण्यात येणार असून आर्थिक व्यवहारांना परवानगी देताना विशेषत: शेतकरी व रोजंदारीवर काम करणार्‍यांचे हित लक्षात घेतले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला 21 दिवसांचा पहिला लॉकडाऊन मंगळवारी संपला आणि दुसर्‍या 3 मेपर्यंत चालणार्‍या लॉकडाऊनची सुरुवात बुधवारपासून झाली. देशभरातील आपण सारेच एव्हाना लॉकडाऊनच्या जीवनशैलीला थोडेफार रूळलो आहोत. काहींच्या अडचणी, गैरसोयी मोठ्या आहेत, तर इतरांना तुलनेने कमी त्रास सोसावा लागत आहे, परंतु अडचणींवर काय तोडगे काढायचे, कुठे आणि कुणाला कशी मदत पुरवायची याची एव्हाना तोंडओळख झाल्याने मदतीला अनुभवामुळे नेमके स्वरूप येण्याची शक्यता आहे. देशात आतापर्यंत 11 हजारांच्या वर कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यापैकी 1306 रुग्ण बरे झाले आहेत, तर 377 जण दगावले आहेत. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या तीन हजारांच्या आसपास असून यातील निम्मे एकट्या मुंबईतील आहेत. परिस्थितीत सुधारणा झाली नसली तरी लॉकडाऊनमुळेच आपण परिस्थिती काहिशी नियंत्रणात राखू शकलो आहोत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच लॉकडाऊनचाच मार्ग सरकारने कायम ठेवला आहे. देशातील सर्व जिल्ह्यांची हॉटस्पॉट, नॉन हॉटस्पॉट आणि ग्रीन झोन अशा तीन प्रकारांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. मंगळवारपर्यंत देशात 170 जिल्हे हे हॉटस्पॉट म्हणून नोंदले होते, तर 207 जिल्हे हे नॉन हॉटस्पॉट आहेत. 20 तारखेपासून ग्रामीण भागातील उद्योगांना काम सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असून त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन मात्र कसोशीने करावे लागेल. रायगड जिल्ह्यातही पनवेल आणि उरण हे दोन तालुके वगळता अन्यत्र कुठेही कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या 21 दिवसांत झालेला नाही. त्यामुळे हे दोन तालुके वगळून जिल्ह्यात अन्यत्र लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून येथील अन्य तालुक्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यास राज्यातील अर्थकारण पुन्हा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना हातभारच लागू शकेल. दरम्यान, देशातील विमान, रेल्वे व रस्ते वाहतूक 3 मेपर्यंत बंदच राहील, असेही नव्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचा फैलाव हॉटस्पॉट असलेल्या भागांतून अन्यत्र जाऊ नये यासाठी ही बंदी आवश्यकच आहे. शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेसही या कालावधीत बंदच राहतील, हे स्पष्टपणे नमूद करून केंद्र सरकारने विद्यार्थी व पालकांनाही दिलासा दिला आहे. सर्व प्रकारची गर्दी होणारी ठिकाणे उदाहरणार्थ सिनेमा हॉल्स, शॉपिंग मॉल, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे या काळात बंदच राहणार असून सामाजिक, राजकीय व अन्य कार्यक्रमांना बंदी असणार आहे. सर्व प्रकारच्या मालवाहतुकीस मात्र परवानगी असणार आहे. एकंदरच कोरोनाच्या फैलावास अटकाव करतानाच देशातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी असा केंद्र सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. नागरिकांनीही आपापल्या परीने लॉकडाऊनच्या निर्बंधांचे शिस्तीने व जबाबदारीने पालन करून कोरोनाचे संकट थोपवण्याच्या प्रयासांना हातभार लावला पाहिजे.

Check Also

भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अलिबाग : प्रतिनिधीसध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या …

Leave a Reply