कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वणवे लागत आहेत. या आगी लागतात की जाणूनबुजून लावल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे. वणवे लावणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे.
साधारणपणे फेब्रुवारीपासून आजतागायत मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनामार्फत दरवर्षी वनीकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून झाडे लावली जातात. अनेक सामाजिक संस्था पावसाळ्यात आपल्या परीने वृक्ष लागवड करतात. वृक्षप्रेमी आणि दादासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशानुसार बैठकीला जाणारे दासभक्त झाडे जगवण्यासाठी त्यांना पाणी घालून भोवतालचे गवत काढून झाडांना जीवापाड जपतात, परंतु काही दृष्ट लोक दरवर्षी वनसंपदा नष्ट करतात. अशा आगींमुळे जंगलातील गवत भस्म होते आणि गुराढोरांना वणवण फिरावे लागते.
तालुक्याच्या प्रत्येक भागात दरवर्षी नित्यनेमाने आगी लागूनही फॉरेस्ट खात्याला आग लावणार्यांपैकी एकालाही कधीच पकडता आले नाही याचे नवल वाटते. शासनाने अशा प्रकारे आग लावणे हा अदखलपात्र गुन्हा घोषित करून तसे करणार्याला जबर शिक्षेची तरतूद केली पाहिजे. फॉरेस्ट खात्याने गावागावांत आपले हेर ठेवावेत. खबर देणार्याचे नाव गुप्त ठेवून त्याला चांगले बक्षीस द्यावे. असे कृत्य करणार्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई केल्यास इतरांनाही जरब बसेल. जंगल संपदा वाचवायची असेल, तर कडक धोरण राबविलेच पाहिजे, अन्यथा तालुक्याला स्मशानकळा येईल, असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी व्यक्त केले आहे.