धाटाव ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील बाहेगाव फळ, भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या गावातील अनेक शेतकरी आणि बागायतदारांचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दक्षिण रायगड भाजपच्या शिष्टमंडळाकडून येथे भेट देण्यात आली.
या वेळी त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदतीचे आश्वासन देण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकर्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
बाहे येथील प्रगतशील शेतकरी रमेश जाधव यांनी एक एकर क्षेत्रात पेरूचे पीक घेतले होते. पेरूची बाग पूर्णपणे बहरली असताना तौक्तेने हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले. त्यामुळे रमेश जाधव हताश झाले होते. अशा परिस्थितीत रमेश जाधव खचून न जाता पुन्हा जोमाने रोपे उभी करण्यात यशस्वी झाले. आता पुढच्या वर्षी चांगले पीक घेण्यात यशस्वी होणार अशी जिद्द रमेश जाधव यांनी दाखविली आहे.
रमेश जाधव या प्रगतशील शेतकर्याने नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण करून ठेवला होता.
आपले शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेतात याचा मला अभिमान व आनंद आहे, असे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी पाहणीदरम्यान सांगितले. अशा नुकसानग्रस्त शेतकर्यांचे मनोबल वाढविण्यासाठी इतरांनाही भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजप दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मापारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, रोहा माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, पत्रकार सचिन साळुंखे यांच्यासह भाजप पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.