प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
शेतकर्यांच्या जमिनीला कमी भाव जाहीर करून सरकारने त्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे संघर्ष अटळ होता. लोकनेते दि. बा. पाटील यांनी सरकारला अखेरचा इशारा देत सांगितले की, शेतकर्यांच्या जमिनीला 40 हजार रुपये एकरी भाव मिळाल्याशिवाय जमिनीला हात लावू देणार नाही. सरकारने जुलूम जबरदस्तीने त्या घेण्याचा प्रयत्न केला तर येथे रक्तरंजित क्रांती घडेल.
सरकारला हा इशारा देत असतानाच त्यांनी लढ्याची तयारीही सुरू केली.त्यासाठी 8 जानेवारी 1984 रोजी जासई गावात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची एक भव्य परिषद घेतली. या परिषदेत लढ्याची रणनीती ठरणार होती. या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी अलिबागचे आमदार दत्ता पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव हांडे, भाई बंदरकर असे दिग्गज नेते तर उपस्थित होतेच, पण शेकापच्या चिटणीस मंडळाचे सारे सभासदही उपस्थित होते.
या सार्या वक्त्यांनी शेतकर्यांच्या न्याय्य मागण्या रास्त असून आंदोलनाशिवाय सरकारची नशा उतरणार नाही. त्यासाठी हा लढा प्राणपणाने लढला पाहिजे, असे सांगितले. दि. बा. पाटील यांनी तर या वेळी तुफान टोलेबाजी करून सरकारवर खरपूस टीका केली. वसंतदादांचे हे सरकार शेतकर्यांवर जुलूम, जबरदस्ती करणारे हटवादी सरकार आहे.त्यामुळे हा लढा शेतकर्यांच्या जीवन मरणाचा बनला असून तो एकजुटीने व सर्वस्व पणाला लावून लढला पाहिजे, प्रसंगी तो रक्तरंजित झाला तरी चालेल, पण या जुलमी सरकारपुढे शेतकरी कधीही झुकणार नाही, वाकणार नाही. हे सरकार शेतकर्यांच्या जमिनी हिसकावून घेत त्यांना भूमीहीन करून देशोधडीला लावत आहे, असे ठामपणे सांगितले.
या प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेला हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. त्या सर्व शेतकर्यांनी एकच निर्धार केला आता माघार नाही. आता लढायचं तेही सर्वस्व पणाला लावून! जीवाची बाजी करून.
शेतकर्यांचा हा उद्रेक अनावर झाला होता. तो कोणत्याही क्षणी बाहेर पडण्याची शक्यता होती. परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती आणि सरकार बेपर्वाईने वागत होते.
12 जानेवारी 1984 रोजी सिडको अधिकार्यांनी तर कहरच केला. अशा स्फोटक परिस्थितीत ते धुतूम गावात पोलीस फौजफाटा घेऊन शेतकर्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी आले, पण गावकर्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला.ते एवढे चिडले होते की गावातील सर्व गावकरी एकत्र झाले आणि त्यांनी पोलिसांना न जुमानता त्यांना गावाबाहेर पिटाळून लावले. सिडको अधिकार्यांनी या घटनेचा खरेतर बोध घ्यायला हवा होता, पण सरकारने चालविलेल्या जबरदस्तीत तेही सामिल झाले होते.
13 जानेवारीला ते शेवे गावात घुसले. आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता या वेळी त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली होती. त्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त आपल्यासोबत आणला होता. ज्या वेळी सिडको अधिकारी जमीन संपादनासाठी पुढे आले तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी गावातील महिला प्रथम पुढे सरसावल्या. पोलिसांनी त्यांना मागे हटवण्याचा प्रयत्न केला, पण त्या चिडलेल्या महिला हटत नसल्याचे पाहून पोलिसांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गाळीबारात दोन महिला जखमी होऊन खाली कोसळल्या, पण महिला मागे हटल्या नाहीत. गावात हलकल्लोळ माजला.वातावरण तंग झाले. महिलांचा हा निर्धार पाहून पोलीस चक्रावले. सिडको अधिकारी घाबरले. त्यांनी गावातून काढता पाय घेतला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या महिलांना शेवटी गावातील लोकांनी दवाखान्यात नेले, पण अधिक रक्तस्राव होत असल्याने त्यांना पुढे मुंबईला हलविले. शेतकर्यांच्या रक्तरंजित क्रांतीला आता सुरुवात झाली होती.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …