Breaking News

बदलापूर-कर्जत-खोपोली रेल्वे पुन्हा रुळावर

48 तासांनंतर उपनगरीय सेवा पूर्ववत, प्रवाशांना दिलासा, प्रशासनाचे मानले आभार

कर्जत : बातमीदार

शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे बदलापूर-कर्जतदरम्यानची रेल्वे वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. तब्बल 48 तासांनंतर म्हणजे मंगळवारी (दि. 6) सकाळी उपनगरीय लोकलची सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी मध्य रेल्वेने कर्जत-खोपोलीदरम्यान शटल सेवा सुरू केल्याने प्रवाशांना मुंबईला जाणे शक्य झाले होते.

सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला होता. त्या पुराच्या पाण्यामुळे नेरळ-शेलूदरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या खालील माती वाहून गेली होती. त्यामुळे रविवारी पहाटेपासून मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा बदलापूरपासून कर्जतपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्याचवेळी खोपोली-कर्जत मार्गावर लौजी स्टेशन भागातदेखील रुळाखालील माती वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती, मात्र प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन कर्जत-पनवेल मार्गावर सोमवारी (दि. 5) शटल सेवा चालवली गेली. या शटल सेवेच्या सहा फेर्‍या कर्जत-पनवेल मार्गावर चालविण्यात आल्या, मात्र खोपोलीपासून कर्जत आणि कर्जतपासून बदलापूरपर्यंत कोणतीही उपनगरीय सेवा रविवारी पहाटेपासून चालवली गेली नव्हती.

सोमवारी शेलू-नेरळदरम्यान सुरू असलेली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी 200 कामगार रेल्वेने तैनात केले होते. तीन मालगाड्या भरून खडी आणि दगड आणून टाकल्यानंतर सोमवारी रात्री बदलापूर-कर्जत हा मार्ग वाहतूक करण्यासाठी सक्षम बनवण्यात आला. रात्री मध्य रेल्वेने बदलापूरपासून कर्जतपर्यंत दोन मालवाहू गाड्या चालवल्या. या मालवाहू गाड्यांमध्ये सामान भरले होते आणि त्या गाड्या विनासायास शेलू-नेरळ भागातून गेल्या होत्या. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी पहाटे ठाणे -कर्जत लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी पहाटे पाच वाजता कर्जतकरिता उपनगरीय लोकल निघाली आणि ती लोकल वेळेवर कर्जत येथे सकाळी साडेसहा वाजता पोहचली. त्याचवेळी कर्जत येथून मुंबईकरिता पहिली लोकल पहाटे 5 वाजून 53 मिनिटांनी निघाली, मात्र नेरळ स्थानकात 10 मिनिटे उशिरा पोहचलेल्या या लोकलमध्ये बिघाड झाल्याने ती गाडी नेरळ स्थानकात रद्द करण्यात आली. नंतर कर्जत येथून 6 वाजून 34 मिनिटांनी मुंबई सीएसएमटीकरिता लोकल निघाली आणि ती कोणत्याही अडथळ्याविना पोहचली, तर खोपोली-कर्जत मार्गावर सकाळी 7 वाजून 20 मिनिटांपासून सेवा सुरू करण्यात आली. या दोन्ही सेवा सुरू झाल्यामुळे कर्जत-पनवेल मार्गावर चालवली जाणारी शटल सेवा स्थगित करण्यात आली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply