Breaking News

अनलॉक होतोय, पण जरा जपून!

कोरोना रुग्णांची संख्या घटू लागल्याने राज्यात अखेर सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केला जाणार आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यांत निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. असे असले तरी पुन्हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यापुढेही काळजी घेत राहणे आवश्यक आहे. राज्यात अनलॉक करीत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10 जिल्ह्यांचा, दुसर्‍या स्तरात दोन, तिसर्‍या स्तरात 15, चौथ्या स्तरात आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्यास पाचव्या स्तरात संबंधित जिल्ह्याचा समावेश केला जाईल. जिल्ह्यामध्ये किंवा महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची तसेच सध्या रुग्ण असलेल्या बेडची संख्या किती आहे यावरून पाच गटांमध्ये विभागणी केली जाणार आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतील असा पहिला गट, ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40च्या दरम्यान असेल तो दुसरा गट. पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असतील तो तिसरा गट, ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्केदरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असतील तो चौथा गट आणि जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असतील असा पाचवा गट असणार आहे. दर आठवड्याला स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या जिल्ह्याचा किंवा महानगरपालिकेचा गट ठरवला जाणार असल्याचे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. राज्यातील अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात हिंगोली, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई आणि उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम या आठ जिल्ह्यांचा समावेश तिसर्‍या टप्प्यात आहे. चौथ्या टप्प्यात पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे आठ आहेत. सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यांत जास्त रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. खरेतर गेल्या अनेक दिवसांपासून दुकानदार, व्यापारी निर्बंध शिथिल करण्याची मागणी करीत होते. अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍यांना सवलत देण्यात आलेली होती, मात्र अन्य घटक अडकून पडले होते. होणारे नुकसान लक्षात घेता राज्य सरकारने घोषित केलेली मदत तुटपुंजी होती, मात्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने अनलॉक करण्यासाठी सरकार तयार नव्हते. अखेर रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर दिलासा देण्यात आला. असे असले तरी कोरोना अद्याप पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे येत्या काळातही सर्वांना सतर्क राहून काळजी घ्यावी लागणार आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply