पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत कचर्याची समस्या गंभीर झाली आहे. घंटागाड्या फिरूनदेखील काही नागरिक कचराकुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात स्वच्छता राखणे गरजेचे असताना पालीत सर्वत्र केरकचरा व घाण पसरत असल्याने रोगराईला खतपाणी मिळत आहे. कचरा समस्येवर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी पालीत घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या चार घंटागाड्या पालीच्या विविध भागात फिरून कचरा गोळा करतात. रविवारीच फक्त घंटागाड्या फिरत नाहीत. त्यानंतर सोमवारी अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या व रस्त्याच्या कडेला कचर्याचा ढीग पडलेला असतो. इतर दिवशीदेखील हीच परिस्थिती पहायला मिळते. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार तसेच नागरिक घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच कचरा कुंड्यांमध्ये किंवा रस्त्यावर टाकतात. भटकी कुत्री व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटकी कुत्री अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा कचरा व घाण रस्त्यावर व बाजुच्या गटारात पडते. यामुळे नागरिकांसह भाविकांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
अपुरे सफाई कर्मचारी
पाली नगरपंचायतीकडे अधिकृत 15 ते 18 सफाई कर्मचारी आहेत. मात्र तुटपूंजा पगार व सेवासुविधांचा अभाव यामुळे प्रत्यक्षात जेमतेम 9-10 कर्मचारी रोज कामावर येतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडतो. त्यांना सर्वच ठिकाणची साफसफाई करणे शक्य होत नाही.
अधिक घंटागाड्या हव्या
सध्या कचरा उचलण्यासाठी एक ट्रॅक्टर व दोन घंटागाड्या आहेत. यातील एक घंटागाडी छोटी व बंदिस्थ आहे. त्यामुळे तिच्यात अधिक कचरा सामावत नाही. तसेच पालीचा विस्तार वाढत असल्याने अधिकच्या घंटागाड्यांची आवश्यकता आहे.