पनवेल : वार्ताहर
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील तसेच अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल या धर्तीवर 1 मार्च 2021 पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे नवी मुंबई यांचे वतीने महाराष्ट्रातील महत्वाच्या मुंबई-पुणे महामार्गावर मार्च 2021पासून मृत्युंजय दुत ही संकल्पना राबविण्यात येत असून आत्तापर्यंत या दूतांनी 22 जणांचे प्राण वाचविले आहेत. महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पेच्या हद्दीमध्ये एकुण 36 मृत्युंजय दुत कार्यरत आहेत. या संकल्पनेमध्ये महामार्गाच्या लगतच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक सरकारी संस्था व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, ढाबे, पेट्रोल पंपाचे कर्मचारी व केनचे कर्मचारी यांचा मृत्युंजय दुतमध्ये सामावेश केलेला आहे. या सर्व मृत्युंजय दुत यांना अजिवली ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. प्रभाकर पटेल व त्यांचा स्टाफ तसेच आयआरबीचे डॉ. रोख यांच्यामार्फत महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे यांचे वतीने सर्व मृत्युंजय दुत यांना महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे याठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे व एखादा अपघात झाल्यास कसा प्रतिसाद द्यायचा याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले गेले आहे. देवदुतांना स्ट्रेचर व प्राथमिक उपचारासांठीचे साहित्यही पुरविण्यात आलेले आहे. याशिवाय महामार्गावरील रूग्णालयांची नावे व त्यांचे संपर्क क्रमांकही देण्यात आलेले आहेत. महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पेच्या हद्दीमध्ये 1 मार्च ते 10 जुनदरम्यान एकुण नऊ अपघातांमध्ये 11 लोकांचा मृत्यू झालेला असुन या अपघातामध्ये महामार्ग पोलीस व मृत्युंजय दुत यांनी तत्काळ जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने एकुण 17 अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे पळस्पे महामार्ग पोलीस केंद्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.