कोलकाता : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौर्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 7) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. बंगालने परिवर्तनासाठीच ममतादीदींवर विश्वास ठेवला, पण दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केले. मुलींवर अत्याचार केले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी ममता सरकारवर टीकास्त्र डागले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर झाली. या वेळी पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला. बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत, ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशाण, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पुत्र दिला. अशा पवित्र भूमीला मी नमन करतो. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले. ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. त्याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. बंगालने परिवर्तनासाठी ममतादीदींवर विश्वास टाकला होता, पण दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केले. येथील बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले. या वेळच्या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस, त्यांची बंगालविरोधी वागणूक आहे, तर दुसर्या बाजूला बंगालची जनता पाय रोवून उभी आहे. ब्रिगेड मैदानावरील जनतेचा आवाज ऐकल्यानंतर कुणालाही याबाबत शंका राहणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी पुढे बोलताना सांगितले की, या ब्रिगेड मैदानावरून तुम्हाला आशोल पोरिबोरतोची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलोय. हा विश्वास आहे बंगालच्या विकासाचा, येथील परिस्थिती बदलण्याचा, गुंतवणूक वाढवण्याचा, पुनर्निर्माण करण्याचा, संस्कृती रक्षणाचा. मी ग्वाही देतो की येथील तरुण, शेतकरी, भगिनी आणि मुलींच्या विकासासाठी आम्ही 24 तास काम करू. कष्ट करण्यात कोणतीही कुचराई करणार नाही.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये
ज्येष्ठे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी त्यांनी ‘कमळ’ हाती घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील महिन्यात मिथुन चक्रवर्ती यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथुन भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अशातच मिथुन यांनी शनिवारी बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. अखेर ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे भाजपला बंगालमध्ये नवा स्टार मिळाला असून, तेथे पक्षाची ताकद वाढण्यास मदत मिळणार आहे.