Breaking News

उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला ब्रेक; पावसामुळे अडथळा, केवळ 30 टक्के काम पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील 78 गावे व वाड्यांमधील सुमारे 70 हजाराहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणातील गाळ काढण्याचे काम 24 मे रोजी सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत गाळ काढण्याचे 30 टक्के काम झाले आहे. परंतु पावसाने सुरुवात केल्याने गाळ काढण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे.  पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरु केले जाणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. अलिबाग – रोहा मार्गावरील महान फाट्यापासून काही अंतरावर उमटे या ठिकाणी धरण आहे. 43 वर्षे जुन्या असलेल्या या धरणामधील गाळ काढण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणे जिल्हा परिषदेला न परवडण्यासारखा होता. त्यामुळे या धरणातील गाळ काढण्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते.राज्य सरकारच्या जलसंपदा यांत्रिकी विभागाच्या यंत्र सामुग्रीच्या मदतीने हे गाळ काढण्यास मान्यता मिळाली. या कामातील इंधनाचा सर्व खर्च रायगड जिल्हा परिषदेकडून करण्याबाबत नियोजन करण्यात आले. त्यामुळे 24 मे रोजी गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला होता. पंधरा दिवसात गाळ काढण्याचे काम पुर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे दोन जूनला जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचे विघ्न आल्याने धरणातील गाळ काढण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उमटे धरणातील गाळ काढण्याचे काम सुरु केले. या धरणातून सुमारे 30 टक्के गाळ काढण्यात आला आहे. जलसंपदा यांत्रिकी विभागाला गाळ काढण्यासाठी लागणार्‍या इंधनासाठी सुमारे 10 लाख रुपये देण्यात आले आहेत. पावसामुळे गाळ काढण्याचे काम थांबले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी 2022 ला पुन्हा सुरु केले जाणार आहे.

-संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply