रायगड जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून मिरवणारी नेरळ ग्रामपंचायतीमधील सत्ता शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणार्या ग्रामपंचायतीमध्ये नजीकच्या काळात राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे आहेत. थेट सरपंच म्हणून निवडून आलेले रावजी गोमा शिंगवा यांचे आकस्मिक निधन झाल्याने आता नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सदस्यांतून निवडले जाणार आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतमधील शिवसेनेची सत्ता राजकीय समीकरणे पाहता सेनेच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाकडे आता 17पैकी केवळ सात सदस्य राहिले असून विरोधी पक्षाची भूमिका बजावणार्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि आरपीआय आठवले गट यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या आघाडीकडे तब्बल 11 सदस्य आहेत. डिसेंबर महिन्यात सरपंचपद भरले जाणार असताना विधानसभा निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ऑगस्ट 2019मध्ये घेण्यात आली. त्याआधी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली आहे, मात्र पहिल्यांदा नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार होती आणि त्या वेळी राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना यांची युती झाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष-काँग्रेस-आरपीआय आठवले गट-मनसे यांची आघाडी झाली होती. या आघाडीकडून धाऊ उघडे आणि शिवसेना-भाजप युतीकडून रावजी शिंगवा यांनी थेट सरपंचपदासाठी निवडणूक लढविली. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदावर थेट जनतेतून युतीचे रावजी शिंगवा हे विजयी झाले. त्याच वेळी सेना-भाजप युतीने 12 जागा जिंकत बाजी मारली होती, तर राष्ट्रवादीचे तीन, शेतकरी कामगार पक्षाचा एक, तर शेकाप बंडखोर एक असे विरोधी गटाचे पाच जण विजयी झाले होते. त्यामुळे सरपंच शिवसेनेचा बनल्याने आपोआप उपसरपंचपद युतीमधील सहकारी पक्ष भारतीय जनता पक्षाला दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी शिवसेनेच्या तालुका नेतृत्वाने भाजपला उपसरपंचपद देण्यास नकार दिला. यामागे सप्टेंबर 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेच्या उमेदवाराला छुपी मदत केल्याने उपसरपंचपदाबद्दल भाजपला नकार दिला, असे दबक्या आवाजात उपसरपंचपदाची निवडणूक होताना बोलले जात होते. आपल्या पक्षाचा सरपंच भाजपच्या मदतीने थेट जनतेतून निवडून आल्याने शिवसेनेने युती धर्म पाळला नाही आणि त्याचा फटका उपसरपंचपदाची निवडणूक सत्ताधारी पक्षाने गमावली. 12 सदस्य आणि एक थेट सरपंच असे 13 सदस्यांचे पाठबळ युतीकडे असताना केवळ भाजपला उपसरपंचपद न सोडल्यानेनेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद आणि ग्रामपंचायतमधील सत्ताधारी बहुमत विरोधी पक्ष म्हणून बनलेल्या भाजप-राष्ट्रवादी-शेकाप-शेकाप बंडखोर यांच्याकडे गेले, मात्र थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच रावजी शिंगवा यांच्याकडे असलेला प्रशासकीय अनुभव आणि शहराचा पूर्ण अभ्यास यामुळे कधीही संख्याबळ कमी असल्याचा फटका बसला नाही. मात्र उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला उपसरपंचपद देण्यात आले नसल्याने भाजपने ऐनवेळी सेनेची साथ सोडून विरोधी गटासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शेकापचे बंडखोर म्हणून निवडून आलेले शंकर घोडविंदे हे उपसरपंच बनले. त्यात नेरळ ग्रामपंचायतमध्ये सत्तेची गणिते नेहमीसारखी सत्ता एका पक्षाची आणि उपसरपंच वेगळ्या पक्षाचा अशी नेहमीसारखी झाली होती. त्यानंतर बिग बजेटच्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय घडामोडी घडत असताना आणि प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधून निवडून आलेल्या पार्वती पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर सेनेने उपसरपंचपदावर निवडणूक लढविण्याची संधी दिलेल्या धर्मानंद गायकवाड यांना शिवसेनेच्या नेरळ ग्रामपंचायतीमधील गटातटाच्या राजकारणाचा फटका बसला. सत्तेत असूनदेखील कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेत नसल्याने गायकवाड यांनी शिवसेनेला रामराम ठोकत आरपीआय आठवले गटात प्रवेश करून पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख हे पद मिळवले. ते धर्मानंद गायकवाड आता विरोधी पक्षात असून विरोधी पक्षाची ताकद वाढली होती, मात्र आदिवासी समाजाचे असलेल्या आणि शेकापच्या पॅनलमधून निवडून गेलेले नितीन निरगुडा यांनी सत्ताधारी शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यातून शिवसेनेचे संख्याबळ गायकवाड यांनी साथ सोडल्यानंतरदेखील पूर्वीसारखेच राहिले. धर्मानंद गायकवाड यांच्यासारखे अनुभव नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या पॅनलमधून प्रभाग सहामधून निवडून गेलेल्या शिवाली रासम-पोतदार यांना आले. त्या शिवसेनेच्या सदस्य आहेत, पण त्यांचा कल हा गेले काही महिने विरोधी गटासोबत जवळीक असा आहे. त्यामुळे कालपर्यंत शिवसेनेच्या सात सदस्यांपैकी धर्मानंद गायकवाड, शिवाली रासम-पोतदार हे दोन सदस्य आता सेनेच्या जवळ नाहीत हे दिसत आहे, तर राष्ट्रवादीच्या पार्वती पवार आणि शेकापचे नितीन निरगुडा हे दोघे शिवसेनेच्या जवळ आहेत हे ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत आहे. उपसरपंचपद देण्यावरून फसवणूक केल्याने भाजपने नेरळ ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी सरपंच यांच्या कारभारावर बारीक लक्ष देत अनेक चुकीच्या कामांवर आक्षेप घेतला. भाजप, राष्ट्रवादी व शेकापकडून सतत होणारा विरोध पाहून सत्ताधारी शिवसेनेने नेरळ ग्रामपंचायतमध्ये कारभार करताना विरोधी पक्षाचे सदस्य असलेल्या प्रभागात विकासकामांसाठी निधी दिला जाणार नाही यासाठी तजवीज केली. वर्षभर विकास निधीवाचून ग्रामपंचायतीमध्ये बुक्क्याचा मार सहन करणार्या भाजप व विरोधी पक्षाने शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदमधील नेरळ विकास प्राधिकरणचा निधी आणि रायगड जिल्हा नियोजन मंडळाचा निधी नेरळच्या विकासासाठी खेचून आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेली दोन महिने नेरळ ग्रामपंचायतीकडून सुरू असलेली विकासकामे यांच्यापेक्षा विरोधी पक्षांनी खेचून आणलेल्या निधीमधून अधिक विकासकामे सुरू आहेत हे नेरळकर पाहत आहेत. त्याला काही प्रमाणात नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांचे आजारपणदेखील कारणीभूत आहे. प्रशासनावर वचक असलेल्या व शहराची भौगोलिक परिस्थिती यांची जाणीव असल्याने विकासकामे कोणत्या भागात करायची याचा अभ्यास असूनदेखील शिंगवा हे रुग्णालयात असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला होता. त्यात आजारी असल्याने सरपंच रावजी शिंगवा हे रजेवर जाताच नेरळ ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच शंकर घोडविंदे हे नेरळचे प्रभारी सरपंच बनले. हे सत्तांतर घडताना अवघ्या आठवड्यात थेट सरपंच बनलेले रावजी गोमा शिंगवा यांचे निधन झाले आहे. त्यामुळे थेट सरपंचपद या पंचवार्षिक वर्षात कायमचे रिक्त झाले आहे. त्याचा फटका शिवसेनेला बसला असून भविष्यात या सदस्य मंडळाचे सरपंचपद हे विद्यमान 17 सदस्य यांच्यातून होणार आहे, मात्र प्रभारी सरपंचपद विरोधी गटाकडे येताच रावजी शिंगवा यांच्या काळात पूर्वी विरोधी गटात असलेले सदस्य नेरळ ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी बनले होते. (क्रमशः)
-संतोष पेरणे