Breaking News

अर्जेंटिनाने बलाढ्य उरुग्वेवर केली मात; कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत रॉड्रिगेज चमकला

साव पावलो ः वृत्तसंस्था

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील ‘एल क्लासिको’ लढत म्हणून ओळखल्या जाणार्‍या अर्जेंटिना विरुद्ध उरुग्वे यांच्यातील सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने सरशी साधली. या लढतीत गुइडो रॉड्रिगेजच्या एकमेव गोलच्या बळावर अर्जेंटिनाने 1-0 असा विजय मिळवून गटात अग्रस्थान मिळवले. इस्टाडिओ नॅशनल दी ब्राझिलिया स्टेडियममध्ये झालेल्या ‘अ’ गटातील या सामन्यात रॉड्रिगेजने 13व्या मिनिटाला मेस्सीने डाव्या दिशेने दिलेल्या पासवर हेडरद्वारे गोल नोंदविला. चिलीविरुद्ध बरोबरी पत्करणार्‍या अर्जेंटिनाचे दोन सामन्यांत चार गुण झाले असून 22 जून रोजी त्यांची पॅराग्वेशी गाठ पडणार आहे. दुसरीकडे उरुग्वेने पहिली लढत गमावल्यामुळे पुढील लढतीत चिलीविरुद्ध त्यांना कामगिरी उंचवावीच लागणार आहे. दरम्यान, चिलीने शुक्रवारी झालेल्या सामन्यात बेन ब्रेरेटोनच्या गोलमुळे बोलिव्हियावर 1-0 अशी मात करून पहिल्या विजयाची नोंद केली होती.

पोर्तुगालविरुद्ध जर्मनीला स्वयंगोलने तारले

म्युनिक ः वृत्तसंस्था

फ्रान्सविरुद्ध स्वयंगोलमुळे पराभवाची नामुष्की ओढवलेल्या जर्मनीला पोर्तुगालविरुद्ध दोन स्वयंगोलमुळेच तारले. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगलेल्या उत्कंठावर्धक सामन्यात जर्मनीने गतविजेत्या पोर्तुगालवर 4-2 असा विजय मिळवत युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान कायम राखले. ख्रिस्तियानो रोनाल्डोने 18व्या मिनिटालाच शानदार गोल करीत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली होती. पिछाडीवर पडल्यानंतर जर्मनीचा संघ सातत्याने प्रतिहल्ले चढवत पोर्तुगालच्या बचावपटूंवर दडपण आणत होता. त्याचाच फायदा जर्मनीला झाला. 35व्या मिनिटाला रुबेन डायस आणि 39व्या मिनिटाला राफाएल गुरेरो यांनी केलेल्या स्वयंगोलमुळे जर्मनीला पहिल्या सत्रात 2-1 अशी आघाडी घेता आली. जर्मनीने दुसर्‍या सत्रातही आक्रमणाची धार वाढवली. 51व्या मिनिटाला काय हॅवर्ट्झ आणि 60व्या मिनिटाला रॉबिन गोसेन्सने गोल करीत पोर्तुगालच्या आक्रमणातील हवा काढून घेतली. 67व्या मिनिटाला पोर्तुगालच्या दिएगो जोटाने गोल केला. या विजयामुळे जर्मनी फ-गटात तीन गुणांसह दुसर्‍या स्थानी पोहचला असून पोर्तुगालची तीन गुणांनिशी तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. हंगेरीविरुद्ध बरोबरी पत्करत फ्रान्स चार गुणांसह अग्रस्थानावर आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply