Breaking News

पाणलोट क्षेत्राचे सुयोग्य व्यवस्थापन गरजेचे

महाराष्ट्रातील 307.58 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 174.73 लाख हेक्टर क्षेत्र वहितींखाली आहे. यातील 82 टक्के क्षेत्र पावसावर आधारित कोरडवाहू क्षेत्रात मोडते. यामुळे राज्याचे बहुतांश कृषी व्यवस्थापन कोरडवाहू शेती व्यवसायावर अवलंबून आहे. जलसिंचन आयोगाच्या अहवालावरून राज्यात प्रवाही सिंचनाद्वारे जास्तीत जास्त 56 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास वाव आहे. ही बाब विचारात घेता राज्यात कोरडवाहू शेतीतून उत्पादन वाढविणे, उत्पादनात सातत्य टिकविणे, नैसर्गिक साधनसंपत्तींचा होणारा र्‍हास थांबविणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणलोट क्षेत्राच्या व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही.

राज्यातील मृदुसंधारण कामाचा इतिहास व उपचार पद्धतींचा विचार केल्यास मृदुसंधारण कामाचे प्रामुख्याने तीन टप्पे पड़तात.

अ) पहिला टप्पा (सन 1943 ते 1983) कोरडवाहू क्षेत्राच्या विकासासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी शासनाने सन 1942मध्ये जमीन सुधारणा कायदा केला. राज्यात मृदुसंधारण कामांची सुरुवात 1943पासून झाली. 1943 ते 1983 या कालावधीत वैयक्तिक शेतकर्‍यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाची कामे एकेरी पद्धतीने करण्यात येत होती. ब) दुसर्‍या टप्प्यात 1983पर्यंत एकेरी उपचार पद्धतीने विखुरलेल्या स्वरूपात मृदु व जलसंधारणाची कामे राबविण्यात येत होती. त्यामुळे या कामाचा फायदा ठरावीक क्षेत्रापुरताच मर्यादित होता. त्याचा म्हणावा तसा फायदा सदृशस्थितीत लोकांपुढे दिसून आला नाही, परंतु महाराष्ट्रात दर तीन वर्षांनी येणारी टंचाई परिस्थिती व दर पाच वर्षांनी पडणार्‍या दुष्काळाचे चक्र सुरूच असल्यामुळे जमिनीची धूप थांबविण्याबरोबरच शेतात पाणी अडविणे ही सर्वांत मोठी गरज निर्माण झाली. ही गरज भागविण्यासाठी मृदु संधारणाची वेगवेगळी कामे एकाच क्षेत्रावर जमिनीच्या प्रकारानुसार घेण्यात यावीत ही संकल्पना पुढे आली व 1983 साली ‘सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकास’ कार्यक्रम ही योजना सुरू करण्यात आली. क) तिसर्‍या टप्प्यात ‘सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम’ ही योजना केवळ कृषी विभागामार्फतच राबविण्यात आली. त्यामुळे पाणलोटात एकात्मिक विकास होऊ शकला नाही. पाणलोटाचा एकात्मिक विकास करण्यासाठी त्याच्याशी संलग्र असलेल्या विविध विभागांच्या कामांच्या समन्वयातून शेतीसाठी संरक्षित जलसिंचनाची साधणे निर्माण करणे, भूगर्भाची पाणीपातळी वाढविणे, जमिनीची होणारी प्रचंड धूप कमी करणे, जमिनीची उत्पादकता वाढविणे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपातळीवर उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे या प्रमुख उद्देशांसाठी ऑगस्ट 1992मध्ये गाव हा विकासाचा प्रमुख घटक धरून पाणलोट आधारित काम करण्यासाठी जलसंधारण कार्यक्रम सुरू केला. पाणलोट क्षेत्रात काम करणार्‍या मृदु संधारण, सामाजिक वनीकरण, लघु पाटबंधारे विभाग व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा या विभागांचा समन्वय व नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र जलसंधारण विभाग सुरू करण्यात आला.

कोरडवाहू क्षेत्रातील प्रमुख आव्हाने : * पर्जन्य शेतींचे अधिक शाश्वत व उत्पादनक्षम शेतीत रूपांतर करणे. * शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांना सर्वतोपरी पाठिंबा देऊन त्यांना सक्षम करणे. * ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्र सोडविणे. * ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून गावातच रोजगाराची पुरेशी निर्मिती करणे. * मोठ्या, मध्यम तसेच लघुसिंचन प्रकल्पांच्या पाणवळ क्षेत्रातील धुपीचे प्रमाण कमी करून जलाशयांचे आयुष्यमान वाढविणे. * नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून पर्यावरणाचा समतोल राखणे. * भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे. पडीक व अवनत जमिनी उत्पादनक्षम करणे. * वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्याकरिता व ग्रामीण भागात संपन्नता आणण्याकरिता कृषी उत्पादनात वाढ करून सातत्य राखणे.

पाणलोट क्षेत्र : ज्या एका विशिष्ट क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरीत्या वाहून येऊन एका प्रवाहाद्वारे पुढे वाहते, त्या संपूर्ण क्षेत्रास त्या प्रवाहाचे पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. पाणलोट क्षेत्र निसर्गाच्या जडणघडणीचा एक स्वाभाविक भाग आहे. पाणलोट क्षेत्र एक असे क्षेत्र असते की ज्यात पडलेले पावसाचे पाणी भूपृष्ठावरून वाहताना त्या क्षेत्राच्या आतच वाहून एकाच ठिकाणावरून बाहेर पडते. पाणलोट क्षेत्र जलविभाजक रेषेने सीमाबद्ध असते. भूपृष्ठावरील जलाशयाला व प्रत्येक जलप्रवाहाला स्वतंत्र पाणलोट क्षेत्र असते. पाणलोट क्षेत्र कितीही लहान व कितीही मोठे असू शकते.

पाणलोट क्षेत्र विकासाचे फायदे : पाणलोट क्षेत्र निवडल्यामुळे त्या जमिनीच्या मगदुरानुसार व उपयोग क्षमतेनुसार विविध उपचार केले जातात व जमिनीचे योग्य प्रकारे संवर्धन होते, तसेच पाणलोट क्षेत्रात किती पाऊस पडतो, किती पाणी उपलब्ध होणार, किती पाणी विविध ठिकाणी अडविले जाणार, किती पाणी बाहेर वाहून जाणार याचा हिशेब करून नियोजन करता येते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरवण्यासाठी त्या क्षेत्रावर निरनिराळे उपाय करता येतात. पाणलोट क्षेत्रातील सर्व जमिनीवर उतारानुसार तसेच पाणी साठविण्याची क्षमता यांचा विचार करून कामे केली जातात. पाणलोट क्षेत्रामुळे मृदु संधारण व जलसंधारणाची सर्व कामे या क्षेत्रावर केली जातात. ही कामे एकमेकांना पूरक असल्यामुळे त्यांचा एकत्रित परिणाम निश्चितच चांगला दिसून येतो. (स्रोत ः कृषी विभाग महाराष्ट्र शासन)

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply