स्वत: प्रयत्न करून लस टोचून घेणे प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे. अजूनही अनेक सुशिक्षित लोक लस घेण्याची टाळाटाळ करतात असे निदर्शनास येते. सरकारी आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी आपल्या दारी येतील तेव्हाच लस घ्यायची असा अनेकांचा दृष्टिकोन दिसतो. तो योग्य नव्हे. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लस देणे इष्ट असले तरी अन्य नागरिकांनी मात्र अग्रक्रमाने स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबीयांना मिळेल ती लस लवकरात लवकर टोचून घेण्याची गरज आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागलेली असताना संभाव्य तिसर्या लाटेच्या भीतीचे सावट संपूर्ण देशावर आहेच. काहीतरी चमत्कार घडो आणि तिसरी लाट न येवो, अशीच प्रार्थना सारे जण करीत असतील. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये लसीकरणाचे अस्त्र हे एकमेव आणि अमोघ आहे. जितक्या वेगाने लसीकरणाचा कार्यक्रम राबवता येईल तितका तो राबवला पाहिजे, अन्यथा कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे, असे साथरोगतज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. नागरिकांनीही उगीच गोंधळ न घालता मिळेल तिथून लस टोचून घेण्याकडे लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताणदेखील कमी होईल. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरू लागली असून मृतांची संख्यादेखील घसरू लागली आहे. पॉझिटिव्हिटी रेटदेखील लक्षणीयरीत्या खाली येऊ लागला असून रस्त्यांवरील गर्दी वाढताना दिसत आहे. पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दुसरी लाट अतिशय वेगाने अंगावर आली होती. याचे भान ठेवून नागरिकांनी या वेळी संपूर्ण दक्षता घ्यायला हवी. अशी दक्षता घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे डेल्टा प्लस या कोरोना विषाणूची भीती. कोरोना विषाणूचे जगभर अनेक प्रकार सापडतात. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या निरनिराळ्या प्रकारांना ग्रीक मुळाक्षरांची नावे दिली आहेत. त्यापैकी डेल्टा या प्रकारचा विषाणू भारतात प्रामुख्याने आढळतो. त्या विषाणूमध्ये आता उत्परिवर्तन झाले असून त्याचे रूपांतर डेल्टा प्लस या प्रकारात झाले आहे. दुर्दैवाने डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूची अधिक माहिती अद्याप शास्त्रज्ञांकडे नाही. हा विषाणू कोरोना प्रतिबंधक लसींना हुलकावणी देणारा असू शकतो या भीतीने साथरोगतज्ज्ञांना ग्रासले आहे. आजमितीस देशामध्ये डेल्टा प्लस विषाणूचे 22 रुग्ण आढळले असून त्यातील 16 रुग्ण महाराष्ट्रातीलच आहेत ही खरी चिंतेची बाब आहे. डेल्टा प्लसची लागण झालेल्या राज्यातील रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. त्याचबरोबर पालघर, ठाणे आणि मुंबईतही डेल्टा प्लसची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने या नव्या विषाणूला चिंताजनक विषाणूच्या वर्गात समाविष्ट केले आहे. लसीकरणाचा वेग कितीही वाढवला तरी डेल्टा प्लस विषाणूला रोखण्यासाठी सर्वांनाच विशेष प्रयत्न करावे लागतील. ही घातक लागण वेळीच रोखता आली तर तिसर्या लाटेचे भय काहिसे कमी होईल. छोटी छोटी प्रतिबंधित क्षेत्रे आणि लागणीचा माग काढणे या दोन प्रमुख उपायांनी डेल्टा प्लसचा संसर्ग रोखता येईल, पण त्यासाठी आरोग्य यंत्रणा जितकी सतर्क हवी तितकेच नागरिकांचे सहकार्यदेखील गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल तेव्हा येईल, त्याआधी डेल्टा प्लस या नवविषाणूची भीती मात्र सर्वांना संत्रस्त करीत आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …