महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरगाव आदिवासीवाडी येथे सोमवारी (दि. 21) रात्री एका घरकुलाची भिंत कोसळली. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही, तर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील विहीर कोसळली. यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगडवाडी गावात सुमारे 20 वर्षांपूर्वी ही विहीर पक्क्या स्वरूपात बांधली होती. त्यानंतर किरकोळ डागडुजी करण्यात आली होती. या विहिरीवर बेतलेल्या योजनेमधून परडी, कोळी आवाड, रायगडवाडी गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळा सुरू होताच ही विहीर कोसळण्यास सुरुवात झाली होती. पावसाचा जोर कायम राहिल्याने दोन दिवसांपूर्वी ही विहीर पूर्ण कोसळली आहे. विहीर कोसळल्याने ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या विहिरीचे अंदाजपत्रक तयार करून त्वरित दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी सरपंच प्रेरणा प्रभाकर सावंत यांनी केली आहे. जोरदार पावसामुळे महाड शहराजवळ असलेल्या शिरगाव आदिवासीवाडी येथील चंद्रकांत पांडू वाघमारे यांच्या घराची भिंत सोमवारी रात्री दहाच्या सुमारास कोसळली. या वेळी घरातील विजय मुकणे, शांती वाघमारे, लता मुकणे हे आतमध्ये अडकले. त्यांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले.