Breaking News

कोरोनामुळे मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला घरघर

कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध जारी ठेवले असून कोरोनाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करीत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे मुरुडसारख्या निसर्गरम्य व ऐतिहासिक स्थळाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याने एरव्ही सदैव गजबज असलेल्या तालुक्यातील बीचवर गेल्या काही महिन्यांपासून शुकशुकाट दिसून येत आहे. त्याचा पर्यटनावरच अवलंबून असलेल्या स्थानिक हॉटेल, लॉजिंग व छोट्याछोट्या व्यवसायिकांवर मोठा परिणाम झाला असून ते सर्व लॉकडाऊन उठविण्याच्या प्रतीक्षेत  आहेत. मुरुड तालुक्यात भात शेती, मत्स्य व्यवसाय सोडला तर उपजिविकेसाठी बहुतांश लोक पर्यटनपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून पर्यटन व्यवसाय ठप्प असल्याने येथील आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मुरुडमध्ये देश – विदेशातून पर्यटक येतात. त्यांना सुखरूप किल्ल्यापर्यंत ने-आण करण्यासाठी यांत्रीक आणि शिडांच्या होड्या आहेत. तालुक्यातील राजपुरी, दिघी, आगरदांडा या भागातून येणार्‍या पर्यटकांना जंजिरा किल्ला दाखवण्याचे काम राजपुरी व आगरदांडा परिसरातील मजूर करतात. जंजिरा किल्ल्यापासून सुमारे 250 स्थानिक लोकांना रोजगार मिळत होता. लॉकडाऊनमुळे आता हा व्यवसाय पूर्णतः बंद झाला आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले लोक फार चिंतेत आहेत. जंजिरा किल्ल्याच्या परिसरात टोपी, गॉगल्स, शहाळी विक्रेते, चहाची टपरी, सरबत स्टॉल आदी सर्वच दुकाने बंद झाल्याने या लोकांचाही रोजगार बुडाला आहे. मुरूडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण. दरवर्षी सरासरी सहा लाख पर्यटक या किल्ल्याला भेट देत असत. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांनी पाठफिरविल्याने बीचवरील स्टॉल्सवरील गर्दी,  नारळपाणी, पाणीपुरी, खाद्यपदार्थांसाठी लागणार्‍या रांगा, बच्चे कंपनीचा टांगा गाडीवरील जल्लोष, समुद्रात डुब्बा मारणारे हौशी कलाकार अदृष्य झाल्याचे चित्र हैराण करणारे आहे. पर्यटकच नसल्याने समुद्रकिनारी असणार्‍या वॉटरस्पोर्ट, घोडागाडी, उंटसफर, बोटींग आदी व्यवसायांना अवकळा आली आहे. मुरुड व काशिद समुद्र किनार्‍यावर 140 पेक्षा जास्त टपरीधारक असून पर्यटक नसल्याने व संचार बंदीमुळे सर्वांचे रोजगार बुडाले आहेत.पर्यटन व्यवसाय हा कधीही न संपणारा व आर्थिकदृष्ट्या लाभदायी असला तरी आज या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन दरबारी याचना करुनही येथील टपरीधारकांना छदामदेखील मिळाला नाही. सीआरझेडचे कारण दाखवत त्यांना मदत नाकारली. मुरूड तालुक्यातील दिघी -आगरदांडा बंदर गेल्या 10 वर्षापासून पुर्णत्वास गेलेले नाही. ते सुरू झाले तर येथील कुशल कामगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध उठविण्याची मागणी येथील हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे. त्याचबरोबर येथील जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्यास संक्रमीत होणार्‍यांची संख्या कमी होईल व पर्यटकांसह व्यावसायिकांना भयमुक्त वातावरणात वावरता येईल. स्थिती पुर्ववत व्हायला मदत होईल. लसीकरणासाठी प्रशासनाने कंबर कसली असून ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी लसीकरण  करण्यात येत आहे. लसीकरण झाल्यास मुरुड तालुका कोरोनामुक्त होऊन निर्बंध शिथिल होण्यास मदत होणार आहे.

–संजय करडे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply