सिटी इंजिनियरचे 38 एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
गेल्या अनेक दिवसांपासून कामोठे परिसरात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. याबाबत सिडकोला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर कामोठेतील भाजपच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 22) सिडको कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा विभागाचे चिफ इंजिनियर मूळ यांच्याशी चर्चा करून तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर देसाई यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी कामोठ्याला उद्यापासून रोज 38 एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन दिले असून कामोठ्यातील जनतेचा पाण्याचा त्रास लवकरच दूर होणार आहे.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वारंवार पाठपुरावा करून तसेच कामोठे प्रभाग क्रमांक 13च्या नगरसेविका हेमलता गोवारी यांनी पाण्याच्या समस्येसंबंधी वेळोवेळी पत्रव्यवहार करून व अधिकार्यांना कामोठेच्या जनतेची पाण्यामुळे होणारी गैरसोय लक्षात आणून दिली.
सद्यस्थितीत पाऊस हा पूरक प्रमाणात झाल्याने कामोठेच्या जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही, असे आश्वासन देत कामोठ्याला उद्यापासून दररोज 38 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
या वेळी नगरसेवक विकास घरत, सामाजिक कार्यकर्ते भाऊ भगत, भाजप कामोठे महामंत्री सुशीलकुमार शर्मा, सुधीर जाधव, सुष्मा बारस्कर, शुभांगी कदम व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.