कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत संबंधित खात्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर नारीशक्ती संघटनेने तिसर्या दिवशी गुरुवारी (दि. 1) रात्री आपले आमरण उपोषण स्थगित केले. कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावरील चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हॉटेल, गॅरेज आदी दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून या रस्त्याशी निगडित एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कर्जत नगर परिषद यांचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत होेते. चारफाटा येथील अतिक्रमणे दूर करावीत, या मागणीसाठी नारीशक्ती संघटनेच्या ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे यांनी मंगळवार (दि. 29)पासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसर्या दिवशी तहसीलदार विक्रम देशमुख, एमएसआरडीसीचे कनिष्ठ अभियंता रमेश माने यांनी महिला उपोषणकर्त्यांची भेट घेतली, मात्र अतिक्रमणे हटविण्याबाबतचे लेखी पत्र मिळेपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका नारीशक्ती संघटनेने घेतली होती. शेवटी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपअभियंता सीमा पाटील यांनी कर्जतला येऊन संबंधित विभागाचे अभियंते आणि उपोषणकर्त्या महिलांबरोबर चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या सोबत येऊन उपोषणकर्त्यांशी पुन्हा चर्चा केली आणि अतिक्रमणे हटविण्याबाबत लेखी पत्र देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढली. त्यामुळे नारीशक्ती संघटनेने तिसर्या दिवशी रात्री आमरण उपोषण स्थगित केले, मात्र अतिक्रमणे काढले नाही, तर पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा नारीशक्ती संघटनेने दिला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper