नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत पटकावलेल्या 28 पदकांपैकी सर्वाधिक 11 पदकांची कमाई हॉकीमधील आहे, परंतु हा इतिहास 1980पर्यंत भारताच्या पाठीशी होता. त्यानंतर गेली 41 वर्षे भारतीय संघ हॉकीमधील पदकाची प्रतीक्षा करीत आहे. यंदा मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल यांच्या नेतृत्वाखाली भारताचे दोन संघ इतिहास लिहिण्यासाठी उत्सुक आहेत. ऑलिम्पिकसारख्या जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धेत भारताने हॉकीमुळेच ओळख निर्माण केली. भारतीय हॉकीचा 1928 ते 1980 हा सुवर्णकाळ होता. भारताच्या प्रारंभीच्या यशात मेजर ध्यानचंद, रूप सिंग, अजित यांच्यासारख्या अनेक हॉकीपटूंचे योगदान होते. 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांच्या कौशल्यावर प्रभावित होऊन अॅडॉल्फ हिटलर यांनी त्यांच्यापुढे जर्मनीच्या नागरिकत्वाचा प्रस्ताव ठेवला होता, पण तो त्यांनी नाकारला. भारतीय हॉकीला 1968 पासून आव्हान उभे राहिले. मग हॉलंड, पश्चिम जर्मनी, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांनी 1980च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेवर बहिष्कार घातल्यामुळे भारताने सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. त्यानंतर मात्र भारताची घसरण होत गेली. संघटनात्मक वाद, खेळाडू निवडीचे धोरण यामुळे भारतीय हॉकीची वाताहत झाली, परंतु गेली काही वर्षे भारतीय हॉकीला लाभलेले स्थैर्य आशादायी आहे. धनराज पिल्लेने विक्रमी चार ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. 1980मध्ये भारताच्या महिला हॉकी संघाने पदार्पण करताना चौथा क्रमांक मिळवला, तर 2016मध्ये दुसर्यांदा खेळताना गटात अखेरचे स्थान मिळवले. 2019मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय हॉकीपटू मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली पुरुष संघ पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या चार वर्षांतील संघाची कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. 2017मध्ये आशिया चषक, 2018मध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक, 2019मध्ये एफआयएच मालिकेचा अंतिम टप्पा अशा स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत. याशिवाय 2018मधील विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. आता भारतीय संघाचे लक्ष्य ऑलिम्पिक स्पर्धा आहे.