शासकीय आदेशाचे उल्लंघन
नागोठणे ः प्रतिनिधी – रायगड जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्यांव्यतिरिक्त इतर सरसकट सर्वांना वाहनांमध्ये पेट्रोल देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधित आदेशानुसार पत्रकारांना पेट्रोल देण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट असतानाही येथील मुंबई-गोवा महामार्गावर मीरानगर भागात असणार्या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलपंपावर पत्रकारांना त्यांच्या दुचाकीत पेट्रोल भरून देत नसल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत संबंधितांनी विचारणा केल्यानंतर पंपावरील कर्मचारी तसेच व्यवस्थापनाकडून उर्मटपणाची भाषा केली जात आहे, तर काही कर्मचारी पत्रकारांनी काय केले पाहिजे याचा सल्लासुद्धा देत आहेत.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये पुढील आदेश होईपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरविणार्यांनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांना नागरी भागात पेट्रोल देण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित आदेशाची प्रत पोलीस ठाण्यामार्फत सर्व पेट्रोलपंपांवर देण्यात आली आहे. संबंधित पत्र मराठीत असल्याने या अमराठी पेट्रोलपंप चालकांना त्याचा अर्थच कळत नसल्याने ते सर्वच दुचाकीस्वारांकडे पोलिसांचे पत्र मागत असल्याचे आढळून येत आहे. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता जिल्हाधिकारी, रायगड यांनी कोणाला पेट्रोल द्यायचे याचा स्पष्ट उल्लेखच केला असून तशी प्रत त्यांना देण्यातसुद्धा आली आहे. पत्रकारांना त्यांच्या ओळखपत्रावर पेट्रोल देणे आवश्यक तसेच बंधनकारक असल्याचे पोलीस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.