नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर अव्वल स्थानावरून थेट पाचव्या स्थानी घसरण झाली. ट्वेण्टी-20 क्रमवारीत शेफाली वर्मा अव्वल स्थानी कायम आहे आणि स्मृती मानधनाने टॉप थ्रीमध्ये प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत विंडीजने 3-2 असा विजय मिळवला, पण विंडीज कर्णधार टेलर हिची कामगिरी समाधानकारक झालेली नाही आणि तिचे 30 गुणांचे नुकसान झाले.मिताली राज 762 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची लिझली ली (758), ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली (756) व इंग्लंडची टॅमी बीमोंट ( 754) यांचा क्रमांक येतो. स्मृती मानधना 701 गुणांसह नवव्या स्थानी कायम आहे. टी-20 महिला फलंदाजांमध्ये शेफाली 759 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर स्मृतीने एक स्थानाच्या सुधारणेसह तिसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे.