म्युच्युअलफंडात गुंतवणूक करणार्या भारतीय नागरिकांची संख्या वाढत असून त्यांना परतावाही चांगला मिळतो आहे. त्यातही डायरेक्ट मिडकॅप फंड अधिक परतावा देताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे भविष्यात लार्जकॅप होण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांत ही गुंतवणूक केली जाते.
शेअर बाजार व म्यच्युअल फंडाचे नियमन करणार्या सिक्युरिटीज् अॅण्ड एक्सेंज बोर्डाने (सेबी) म्युच्युअल फंडांना त्यांच्या सर्व योजनांची 2018 मध्ये प्रामुख्याने पाच प्रकारात वर्गवारी करण्यास सांगितले. तोपर्यंत अनेक म्युच्युअल फंडांकडे एकाच प्रकारात अनेक योजना कार्यरत होत्या. त्यामुळे गुंतवणूकदाराचा गुंतवणूक करताना गोंधळ होत होता. तो कमी करणे हा या बदलामागील उद्देश होता. सेबीच्या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोणतीही योजना अस्तित्वात असणार्या दुसर्या योजनेच्या उद्दीष्टांच्या जवळ जाणारी नसावी याची काळजी प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीने घेणे तेव्हापासून आवश्यक झाले आहे. सर्व योजना प्रामुख्याने इक्विटी, डेट, हायब्रीड (बॅलन्स्ड), विशिष्ट क्षेत्रातील योजना (विशिष्ट उद्दीष्टांसाठीच्या योजना) व इतर प्रकारातील एकच योजना एका प्रकारात असणे आवश्यक आहे.
इक्विटी म्युच्युअल फंड प्रकारात पहिल्या 1 ते 100 कंपन्यांमधील (कॅपिटलायझेशनप्रमाणे) गुंतवणूक असणार्या योजनेस लार्जकॅप फंड असे म्हणण्यात आले आहे. पुढील 101 ते 250 कंपन्यांमध्ये केली जाणारी गुंतवणूक व या फंडांना मिडकॅप फंड असे म्हटले जाणार आहे. तसेच 251 पासून पुढील कंपन्यांमध्ये केली जाणारी गुंतवणूक ही स्मॉल कॅप फंडाच्या प्रकारात गणली गेली आहे.
तेव्हापासून आलेल्या मिडकॅप फंड योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्याची अनेक कारणे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची येणार्या दशकात होणारी अपेक्षित भरीव प्रगती व या प्रगतीचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे. वेगाने वाढणार्या भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्व महत्त्वाच्या व्यावसायिक क्षेत्रांच्या कंपन्यांची निवड या योजनेमध्ये केली गेली. ज्या क्षेत्रात येणार्या काळात भरीव वाढ होण्याची दाट शक्यता आहे अशा क्षेत्रांची योग्य निवड करून जास्तीत जास्त गुंतवणुकीवर परतावा निर्माण करण्याचा या योजनांचा प्रमुख उद्देश राहिला आहे.
* मिडकॅप फंडाची वैशिष्ट्ये
1) गुंतवणूक करताना जास्त परतावा निर्माण करण्यासाठी जास्तीची जोखीम घेण्याची गरज असते, परंतु या योजनांमध्ये भविष्यातील जास्त परतावा देणार्या कंपन्यांची निवड करून त्यातील जोखीम कमीतकमी कशी करता येईल याचा समतोल सातत्याने राखला जातो.
2) ज्या कंपन्यांच्या नफ्यामध्ये भविष्यात सातत्याने वाढ होणार आहे व कंपनीचे दीर्घकालीन व्यवस्थापन व त्यांच्या भविष्यकालीन दीर्घकालीन उद्दीष्टांचा सखोल विचार केला जातो, अशा कंपन्यांना स्थान. पोर्टफोलिओमध्ये निवडल्या जाणार्या कंपन्यांमध्ये स्थिर व उच्च परतावा देण्याची क्षमता असणार्या कंपन्यांना प्राधान्य देण्यात येते.
3) या योजनांमध्ये फंडाचे व्यवस्थापक प्रामुख्याने 101 ते 250 कंपन्यांच्या वर्गातील उत्कृष्ठ कंपन्यांची निवड करतात.त्यावर सातत्यपूर्ण दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी भर असतो.
मागील अनेक वर्षांमध्ये असे दिसून आले आहे की, मिडकॅप प्रकारातील म्युच्युअल फंडातील योजनांनी लार्जकॅप योजनांपेक्षा जास्त परतावा सातत्याने दिला आहे. यासाठी आपण काही उदाहरणे पाहू.
-संदीप भुशेट्टी, sbhushetty@gmail.com