Breaking News

बनावट कॅटरींग इन्स्पेक्टरच्या आवळल्या मुसक्या

कर्जत आरपीएफ आणि कमर्शिअल विभागाची दमदार कामगिरी

कर्जत : बातमीदार

काही दिवसापासून कल्याण, बदलापूर रेल्वे स्थानकात बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनून धुमाकुळ घालणार्‍या भामट्यास रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कर्जत रेल्वे स्थानकात रंगेहात पकडले. सदर इसम रेल्वे स्थानकातील कॅटरींग व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे कॅटरींग इन्स्पेक्टर बनून त्यांच्याकडील वस्तू तपासण्याचे नाटक करत त्यांना हजारो रुपयांचा गंडा घालत होता.

दिवसांपासून कल्याण ते बदलापुर रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती कॅटरिंग इन्स्पेक्टर असल्याचे भासवत स्टॉल धारकांना  हजारों रुपयांना लुबाडत असल्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या व्यक्तीचा शोध सर्व रेल्वे स्थानकांवर घेण्यात येत होता. या बनावट व्यक्तीचे छायाचित्र हाती लागताच कर्जत विभागातील मध्य रेल्वे प्रशासनाचे कमर्शिअल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे त्यांनी ते रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांकडे ते पाठवून कारवाईचे आदेश दिले.

हे छायाचित्र कर्जत रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिंग यांनाही व्हॉटसअपद्वारे मिळाले होते. दरम्यान, स्वतःला कॅटरींग इन्स्पेक्टर म्हणवणारा सदर भामटा 31ऑगस्ट रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास कर्जत स्थानकामधील फलाट क्रमांक एक वरच्या कॅटरींगचे मॅनेजर मुलायम सिंग यांची चौकशी करायला आला.

ही चौकशी सुरू असताना कर्तव्यावर असलेले आरपिएफ कर्मचारी मुक्कदर तडवी व पंकज सिंग यांना त्याच्या हालचालीवर संशय आला. त्यामुळे त्यांनी बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनून आलेल्या व्यक्तीस आरपीएफ कार्यालयात आणून पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिंग यांच्या समोर हजर केले. सिंग यांनी त्याची कसून चौकशी केली असता सदर व्यक्तीने आपला गुन्हा कबुल केला. सदर इसमाचे नाव मोहम्मद खान (वय 40) असून तो पुजा नगर, मीरा रोड येथील रहिवासी आहे. त्याची चौकशी करुन सिंग यांनी त्याला कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक डोंगरे यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सोपविले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply