Breaking News

नेरळच्या व्यापारी संकुलाचे भाडेकरू कोण?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने 2008 मध्ये नेरळ बाजारपेठमधील सर्व अतिक्रमणे उद्ध्वस्त केली होती. त्या वेळी सर्व 72 टपरीधारकांची बांधकामे उद्ध्वस्त करून नेरळ-माथेरान रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये या टपरीधारकांसाठी रायगड जिल्हा परिषदने नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू केले. आता त्या व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्ण होत आले असून त्या संकुलातील 108 दुकानांचे भाडेकरू कोण? हा प्रश्न नेरळकरांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्या व्यापारी संकुलात व्यवसाय सुरू झाल्यानंतर नेरळ स्टेशनची बाजारपेठ अतिक्रमण मुक्त होणार काय? मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ या जंक्शन स्थानकाची ओळख थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानचे प्रवेशद्वार अशी आहे. त्यामुळे 1975 पासून येथील रेल्वे स्टेशन परिसरात नेरळ गावाची बाजारपेठ वसली. त्यात रेल्वेच्या जमिनीला लागून असलेल्या मोकळ्या जागेत अतिक्रमण करून बांधकामे उभी राहिली आणि एक बाजारपेठच नेरळ गावात सुरू झाली होती. त्या वेळी हुतात्मा भाई कोतवाल चौकापासून मिनाज मेडिकलपर्यंत 72 अतिक्रमणे होती. रस्त्याच्या आणि रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या या टपर्‍या तोडण्यात याव्यात यासाठी 2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये पोलीस बंदोबस्त आणून सार्वजनिक बांधकाम विभागाने नेरळ बाजारपेठेमधील अतिक्रमण उद्ध्वस्त करून येथील रस्ता मोकळा केला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे तात्काळ गटार खोदून रस्ता तयार केला नाही. त्यामुळे काही दिवसांनी तेथे पुन्हा टपर्‍या बांधून व्यवसाय सुरू केले गेले आणि त्यांची संख्या 72 वरून 100 पर्यंत पोहचली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 2016 मध्ये नेरळमधील अंतर्गत रस्त्यांसाठी 22 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर गावातील अतिक्रमण हटविण्याची गरज निर्माण झाली. त्याच काळात नेरळ विकास प्राधिकरणने गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्या वेळी या व्यापारी संकुलात जागा मिळेल, असे आश्वासन अतिक्रमण करणार्‍या टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याकडून मिळवले. दरम्यान, ग्रामपंचायतीने ठाम भूमिका घेतल्याने डिसेंबर 2017 मध्ये पुन्हा नेरळ बाजारपेठेमधील अतिक्रमणे जेसीबी लावून तोडावी लागली होती. त्या वेळी नियोजित व्यापारी संकुलात जागा देण्याचे आश्वासन नेरळ ग्रामपंचायतीने या टपरीधारकांना दिले होते. सुमारे पाच कोटी रुपये खर्चून नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे व्यापारी संकुल आता पूर्णत्वास येत आहे. या व्यापारी संकुलाच्या तीन मजली इमारतीत पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर एकूण 108 दुकानांचे गाळे तयार होत आहेत, तर तिसर्‍या मजल्यावर जिल्हा परिषदेची कार्यालये, तसेच विश्रामगृह असणार आहे. जिल्हा परिषद आणि नेरळ प्राधिकरण यांची कार्यालये तेथे सुरू करण्यात आली आहेत, मात्र विश्रामगृह अद्याप सुरू झाले नाही. त्या विश्रामगृहाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गटाकडे देणार की, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग पाहणार? हा प्रश्नदेखील सध्या अनुत्तरीत आहे, तर पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावरील दुकानांच्या गाळ्यांचे वाटप रायगड जिल्हा परिषद कोणत्या नियमांच्या आधारे करणार? हा नेरळमधील जुन्या टपरीधारकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. दुसरीकडे 2008 मध्ये तोडण्यात आलेल्या टपरीधारकांना या व्यापारी संकुलात गाळे मिळणार की, 2017 मध्ये अतिक्रमणे दुसर्‍यांदा तोडताना जे 100 टपरीधारक होते, त्यांना व्यापारी संकुलात जागा मिळणार? याबाबत रायगड जिल्हा परिषदेने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, पण व्यापारी संकुलाचे गाळ्यांना लोखंडी शटर लावले जात असून संकुलाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे नवीन व्यापारी संकुलात असलेल्या गाळ्यांचे मालक किंवा भाडेकरू कोण होणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, मात्र सध्यातरी हा प्रश्न अनुत्तरीत असून, रायगड जिल्हा परिषदेने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

-संतोष पेरणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply