कोरोना विषाणूचा संसर्ग, त्याचे अलीकडच्या काळात आलेले अनेक नव्या स्वरुपातील विषाणू, कधी नव्हे इतक्या कमालीच्या वेगाने त्याकरिता बनवल्या गेलेल्या लसी, त्यांचा प्रभाव हे सारेच अवघ्या जगाकरिताच नवीन आहे. सगळीकडे सारेच नित्य नव्या घडामोडींतून या विषाणूला, महासाथीला समजू पाहात आहेत. त्यामुळेच सातत्याने यासंदर्भात उलटसुलट विधाने समोर येत राहतात. कोरोनासंदर्भातील सारेच नवीन असल्याने अल्प काळातील निरीक्षणांवर आधारित कुठलेही निष्कर्ष काढणे कुणालाच परवडणारे नाही.
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही हा इशारा बहुदा वारंवार कानावर पडत असल्यामुळे अनेकांवर त्याचा परिणाम होईनासा झाला आहे. जगभरातच वेगाने लसीकरण सुरू आहे. भारताची अफाट लोकसंख्या ध्यानात घेता येथे सर्वांचे लसीकरण कधी आणि कसे पार पडणार याबद्दल सर्व स्तरावर आशंका व्यक्त करण्यात आली होती. या भयभीत करणार्या आशंकांकडे दुर्लक्ष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आणि विविध अडथळे पार करीत या मोहीमेने एव्हाना बरा वेग पकडला आहे. कोरोना रुग्णांची दैनंदिन आकडेवारी केरळ वगळता देशभरात सगळीकडे खाली गेल्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले. अर्थात तसे करण्यावाचून पर्यायही नव्हता. अनेकांकरिता रोजीरोटीची समस्या गंभीर स्वरुप धारण करू लागली होती. एकीकडे व्यापक लसीकरणावर भर देत, निर्बंधांचे पालन थांबवू नका अशी हाकाटी करीत आपण व्यवहार खुले केले. शाळा-कॉलेजे सुरू करावीत अथवा नाहीत यांसारख्या विषयांवर अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. अनेकांच्या रोजीरोटीचा थेट संबंध असूनही मंदिरेही अद्याप खुली झालेली नाहीत. कुठलाही व्यवहार पूर्णत: बंद ठेवणे हे खरे तर संबंधितांवर मोठा अन्याय करणारे आहे. कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून मंदिरेही उघडायला हरकत नाही ही भारतीय जनता पक्षाची मागणी म्हणूनच योग्य ठरते. परंतु प्रश्नांना संतुलित व सुयोग्य पद्धतीने हाताळण्याची अपेक्षा राज्यातील महाविकास आघाडीकडून करता येईल का? कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावामुळे इतर अनेक आघाड्यांवरील समस्यांकडे सरकारकडून डोळेझाक होते आहे. परंतु महासाथीची समस्या गंभीर असल्यामुळे त्याविरोधात फारशी ओरड होत नाही. गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या खाली जाऊ लागल्याने भारताचा महासाथीच्या शेवटाकडे प्रवास सुरू झाला का अशीही चर्चा सुरू झाली. एकीकडे तिसर्या लाटेला तोंड देण्याची तयारी करतानाच ही लाट कदाचित दुसर्या लाटेइतकी तीव्र नसेल अशी दिलासादायक आशाही व्यक्त केली गेली. परंतु गुरूवारी पुन्हा एकदा देशातील रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले. देशभरातील या 46 हजार 164 नव्या रुग्णांमध्ये केरळच्या 31 हजार 445 तर महाराष्ट्राच्या 5 हजार 31 रुग्णांचा समावेश आहे. गुरूवारीच सलग दुसर्या दिवशी राज्यात तसेच मुंबई शहरातही दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ दिसून आली. मुंबईतील आग्रीपाडा येथील अनाथाश्रमातील 22 मुलांना कोरोना झाल्याचेही समोर आले. तिसर्या लाटेत मुलांना अधिक धोका संभवतो असा इशारा यापूर्वी अनेकदा दिला गेला आहे. त्यामुळेच ही धोक्याची घंटा मानली जाते आहे. जगभरातील परिस्थिती लक्षात घेता कोरोनाचा धोका कायम आहे हेच खरे.