Breaking News

खबरदारीला पर्याय नाही

गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेतील कोरोनासंबंधी परिस्थिती आणखीनच गंभीर होत असल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे केरळमध्ये अद्याप दुसरी लाटही पुरती ओसरलेली नाही. देशभरात कदाचित ऑक्टोबरच्या अखेरीस तिसरी लाट येईल असे सांगितले जाते. वेगाने लसीकरण राबवल्यास व सातत्याने कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेतल्यास आपण तिसर्‍या लाटेचा वेग आणि तीव्रता दोन्ही थोपवू शकू या तज्ज्ञांच्या सूचनेचा सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करायला हवा.

गेला महिनाभर कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल झाल्याच्या आनंदात घालवल्यानंतर आता पुन्हा हलकेहलके आसपास कुणीतरी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कानावर पडू लागले आहे. तपशील जाणून घेतल्यास संबंधित व्यक्ती बहुदा कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतलेली किंवा फक्त एकच डोस घेतलेली असल्याचेही लक्षात येते. हे चित्र फक्त आपल्याकडेच आहे असे नाही. अगदी अमेरिकेतही नव्याने नोंदल्या जाणार्‍या कोविड रुग्णांमध्ये व बळींमध्येही लस न घेतलेल्या व्यक्तींचीच संख्या मोठी असल्याचे स्पष्ट दिसते. कोरोनाला अटकाव करायचा असेल तर जगभरातच वेगाने लसीकरण व्हायला हवे हे आता पुरते स्पष्ट होऊ लागले आहे. येत्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची महासभा होणार असून 2022च्या मध्यापर्यंत जगभरातील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हायला हवे असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून सर्व देशांच्या प्रमुखांना केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही येत्या वर्षभरासाठी जागतिक लोकसंख्येच्या 60 टक्के लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोरोना महासाथीचा शेवट व्हायला हवा असेल तर गरीब-श्रीमंत, लहान-मोठ्या सर्व देशांमध्ये लसीकरण वेगाने व्हायला हवे याची जाणीव जागतिक पातळीवर अधोरेखित होऊ लागली आहे हे चांगलेच आहे. विशेषत: श्रीमंत राष्ट्रांनी प्रारंभी लसींचा मोठा साठा आपल्या आर्थिक बळावर बळकावलेला असल्याने त्यांना या वास्तवाची जाणीव होणे आवश्यक आहेच. जगभरात लसीकरण वेगाने राबवले जाण्यासाठी या राष्ट्रांनी पुढाकार घेतला पाहिजे. जितका दीर्घ काळ जगभरात लसीकरण न केलेली लोकसंख्या मोठी असेल तितक्या प्रमाणात कोरोना विषाणू रूप बदलून समोर येत राहील. त्यामुळेच जगभरातच लसीकरणाचा वेग वाढणे अत्यावश्यक झाले आहे. वास्तवत: खुद्द अमेरिकेतही आताच्या घडीला अवघे 53.9 टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण पार पडले आहे तर 63.2 टक्के अमेरिकन नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीला विरोध करणार्‍यांना लसीकरणासाठी तयार करण्याचे मोठे आव्हान अमेरिकेपुढे आहे. अमेरिकेशी तुलना करता तूर्तास भारतातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे हे स्पष्ट दिसते. अमेरिकेत आजच्या घडीला रोज 1 लाख 70 हजार कोविड रुग्णांची नोंद होते आहे तर सुमारे 1800 हून अधिक बळी नोंदले जात आहेत. अमेरिकेतील हे चित्र पाहता आपल्याकडे आपण तिसर्‍या लाटेविषयी किती दक्षता घ्यायला हवी हे वेगळे सांगायलाच नको. केरळमध्ये अद्यापही रोज 15 हजाराच्या आसपास कोरोना केसेसची नोंद होत असून मंगळवारी तेथे 129 कोविड मृत्यू नोंदले गेले. महाराष्ट्रात मंगळवारी 3530 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 52 मृत्यू नोंदले गेले. चाचण्यांची संख्या वाढवल्याने राज्यातल्या रुग्णसंख्येत 20 टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात असले तरी सगळ्यांनीच कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेत राहिले पाहिजे हेच खरे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply