Breaking News

दिलासा! उपचाराधीन रुग्णांत घट; नवी मुंबईतील कोरोना आकडेवारी स्थिर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील निर्बंध शिथिलीकरणानंतर 50 वर स्थिर असलेली कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत ती 100 पर्यंत गेली होती. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खरेदीसाठी झालेली गर्दी पाहता रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत होती, मात्र 100 वर असलेली दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. तर उपचाराधीन रुग्णही कमी होत 550पर्यंत खाली आले आहेत. नवी मुंबई शहरात पहिली कोरोना लाट नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ओसरली होती. त्यानंतर टाळेबंदी शिथिलीकरणानंतर झपाट्याने रुग्णवाढ झाली होती. या काळातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या ही 11 एप्रिल 2021 रोजी 11,605 इतकी नोंदवली गेली होती. त्यामुळे दुसर्‍या लाटेत शहरातील आरोग्य परिस्थिती गंभीर झाली होती. ही पूर्वपरिस्थिती पाहता दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसर्‍या लाटेचा धोका शहरावर कायम आहे. महिनाभरात नवे रुग्ण 100च्या आतच आढळून येत आहेत, तसेच शहरातील कोरोनाबाधितांचे प्रमाण व उपचाराधीन रुग्णही कमी असल्याने शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी खबरदारीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे शहरात रुग्णवाढीचा धोका होता, मात्र अद्याप रुग्णसंख्या स्थिर असल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शहरातील परिस्थिती अत्यंत नियंत्रणात असली तरी धोका कायम आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत पालिका प्रशासन सतर्क असून चाचण्यांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे. ज्या सोसायटीत रुग्ण सापडत आहेत, त्या सोसायटीतील सर्व रहिवाशांची चाचणी करण्यात येत असल्याने प्रादूर्भावावर नियंत्रण असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.  29 जुलैपासून करोना रुग्णांची संख्या 100च्या आत आहे. 16 ऑगस्टला सर्वांत कमी 26 नवे रुग्ण सापडले, तर 17 ऑगस्टला 35 नवे रुग्ण सापडले होते, परंतु आता नवे रुग्ण शंभरपर्यंत आहेत. पालिकेने शहरातील 6900 खाटांची व्यवस्था वाढवून ती 12 हजार खाटांची केली जात आहे. पहिल्या लाटेत एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या 20 ऑगस्टला 477 होती. दुसर्‍या लाटेत ही संख्या 4 एप्रिलला 1441 पर्यंत गेली होती. कोरोना उपचार घेणारे रुग्ण कमी झाले असून शहरात उपचाराधीन रुग्णसंख्याही 550च्या खाली झाली आहे. पण दैनंदिन रुग्ण अचानक वाढण्याची भीतीही प्रशासनाला आहे.

कोरोना रुग्णसंख्या स्थिर आहे, याचा अर्थ धोका टळला असे म्हणता येणार नाही. नियमांचे पालन झाले नसले, तर त्याचे परिणाम साधारण 20 दिवसांनी दिसून येतील.

-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका, नवी मुंबई

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply