Breaking News

विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन!

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात यंदा (27 सप्टेंबर) दुसरा जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे.गेल्या वर्षी कोकणच काय अख्खं जागतिक पर्यटन, ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’वर थांबलं होतं. अपवाद वगळता आजही यात मोठा फरक पडलेला नाही. सन 2050पर्यंत जगातील 68 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात ‘ग्रामीण डेस्टीनेशन्स’ना मोठ्या संधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचीयंदाच्या पर्यटन दिनाची मध्यवर्ती संकल्पना सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन अशी आहे. ‘कोरोनोत्तर काळात ‘ग्रामीण डेस्टीनेशन्स’ना मोठ्या संधींचा कोकण संदर्भात विचार करताना आपल्याला विकासासाठी हव्या असलेल्या सर्वसमावेशक कोकण पर्यटनाचा विचार करावा लागेल.

लोकांपर्यंत पर्यटनाचे महत्त्व पोहचवणे, विविध पर्यटन स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक मूल्यांच्या माहितीचे आदानप्रदान करणे यासाठी 1980 सालापासून आपल्याकडे पर्यटन दिन साजरा होतो आहे. अलिकडे आपल्या देशाने जबाबदार प्रवासी बनविण्याचे लक्ष ठेवले असून त्या पार्श्वभूमीवर इको टूरिझम सोसायटी ऑफ इंडियाचे रिस्पॉन्सिबल टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया असे नामकरण करण्यात आले आहे. ग्रामीण पर्यटनातील संभाव्य संधींचा विचार करता कोकणसह महाराष्ट्रासाठी कोरोनोत्तर काळ सुवर्णकाळ ठरू शकणार आहे. परदेशी पर्यटनात सर्वांत जास्त सहभाग हा 60पेक्षा अधिक वय असलेल्यांचा असतो. कोरोनाने त्यांचा आत्मविश्वास कमी केला आहे. देशांतर्गतही अधिक दिवस फिरणारे लोकं तीन-चार दिवसांच्या पर्यायांचा विचार करतील, असा अंदाज आहे. कोकणसाठी राज्य सरकारने नुकतीच 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मुंबई-सिंधुदुर्ग ह्या 400 किमीच्या ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेस वे) प्रकल्प घोषणा केली. याद्वारे वरळी (मुंबई) उन्नत मार्गावरून साडेतीन तासात मनुष्य सिंधुदुर्गला पोहोचेल अशी संकल्पना आहे. या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) आणि सर्वेक्षण काम सुरु झाले असताना वकील ओवेस पेचकर यांनी हा प्रश्न मुमाबी उच्च न्यायालयात उपस्थित केल्यानंतर ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प पूर्ण करत नाही, तोवर आम्ही तुम्हाला दुसरा प्रकल्प सुरू करू देणार नाही,’ असं उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला सुनावले आहे. पर्यटकांची वर्तमान मानसिकता पुरेसी कॅश करण्यासाठी कोकणचं कोकणीपण टिकायला हवं आहे. असं असताना कोकणात ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या नावाखाली गेली अनेक वर्षे काय सुरु आहे ? याची जाणीव आम्हाला जुलै महिन्यातील अतिवृष्टीने करून दिली आहे.

एकीकडे सरकारचे पर्यटन धोरण हे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असेच असायला हवे, तर दुसरीकडे आपली संस्कृती ‘अतिथी देवो भव’ म्हणत असल्याने आम्ही स्थानिकांनी येणार्‍या पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे थांबवायला हवे. यासाठी यंत्रणा कार्यरत व्हायला हव्यात. आरोग्य पर्यटनसारख्या विषयात केरळ, तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. नैसर्गिक संधी असताना आपण कधी यात पुढाकार घेणार? यासाठी शासन धोरण काय आहे? भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये आजही कोकण दिसत नाही. अपवादात्मक काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसू लागलंय. यातल्या तारकर्लीला 2011 साली आदरातिथ्यात देशात पहिला क्रमांक मिळाला होता. 2015 साली तारकर्लीचा देशातील सर्वोत्कृष्ट सागरी किनारा म्हणून सन्मान झाला होता. असं असलं तरी तारकर्लीतील पर्यटन व्यवसाय हंगाम सहा ते आठ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो? हे फार महत्त्वाचे आहे. कोकणात ठिकठिकाणी पर्यटन संस्था आणि संघ कार्यरत आहे. शासनाने यांना विश्वासात घ्यायला हवे आहे. त्यांच्याकडे कोकण पर्यटन म्हणून काही जबाबदार्‍या सोपवायला हव्या आहेत. जगभरातील पर्यटकाचा कोकण विषयक दृष्टीकोन नकारार्थी होणार नाही याची काळजी घेणारं वृत्तलेखन आणि वार्तांकन होण्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. कोकणात फिरताना पर्यटकांनी कचरा हा कचरा पेटीत टाकावा. पर्यटनस्थळाच्या पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, असे वर्तन असावे. ऐतिहासिक पर्यटनस्थळी आपली नावे लिहिण्याचा मोह टाळावा. तीर्थक्षेत्री अस्वच्छता टाळावी. स्थानिक संस्कृतीची चेष्टा करू नये, यांसारख्या विषयांवर वेळ देऊन काम व्हायला हवं आहे. यासाठी शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोकणी माणसे पर्यटन साक्षर व्हायला हवी आहेत. गुहागर, आरेवारे, कुणकेश्वर, तारकर्ली, वर्सोली, दिवेआगर, केळवा आणि बोर्डी येथे बीचशॅक्ससारख्या नव्याने जन्माला येणार्‍या संकल्पनांना आम्ही थेट गोव्याशी जोडण्यापूर्वी त्यांची कोकणातील मांडणी स्पष्ट करायला हवी आहे. अन्यथा कोकणातील समुद्र किनार्‍यांवर झावळीच्या झोपड्यांमधील बीचशॅक म्हणजे मुली-बाळी निवांत फिरू न शकणारे, कोकणच्या मूळ संस्कृतीला बाधा आणणारे पर्यटन अशी त्यांची ओळख बनेल. कदाचित ती अधिक त्रासदायक ठरेल.

कोकणच्या सागर किनार्‍यावरून मुंबई ते गोवा जाणार्‍या देशातील पहिल्या लक्झरियस क्रुज सेवेला कोकणात थांबा नाही आहे. जलवाहतुकीद्वारे पर्यटन सेवेत असलेल्या कोर्डेलिया क्रूझया कंपनीशी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी)करार केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात क्रूझ टर्मिनलची आवश्यकता असणार आहे. पर्यटनाच्या या नव्या आयामाला शुभेच्छा देताना याच कोकणातल्या दाभोळ बंदराची माहिती घ्यायला हवी आहे. दाभोळ ते गोवळकोट (चिपळूण) बंदरांचे अंतर 30 नॉटिकल मैल अर्थात 44 किमी आहे. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. 26 जानेवारी 1937 ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. 108 फूट खोल, 25 मैल लांब या खाडीत एकावेळी दोन-तीन टनांच्या किमान 100 कार्गोज उभ्या राहू शकतात. सन 1950पर्यंत गत 300 वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्या वेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मली नव्हती. सन 1808 साली अमेरिकेतील बोस्टन येथे प्रसिद्ध झालेल्या विश्व गॅझेटिअरमध्येही दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. इतक्या नैसर्गिक नोंदी उपलब्ध असताना आम्ही निसर्ग र्‍हासाचे प्रकल्प कोकणात का आणतो? वर्षा ऋतूतील कोकणी निसर्ग आणि धबधब्यांविषयी चर्चा करताना ही स्थळे पर्यटक कुटुंबीयांना पर्यटनासाठी सुरक्षित वाटायला हवीत.

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे असे भव्य प्रकल्प असणे काही गैर नव्हे, मात्र एकट्या मुंबईवर आपण प्रकल्पांचा अजून किती ताण देणार आहोत? आणि मुंबईच्या शेजारी असलेल्या कोकणाकडे ममत्वाने कधी पाहाणार? सर्वसमावेशक विचार झाल्यास इथल्या पर्यटन दिनाचे भविष्य उज्ज्वल आहे. कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी  टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनार्‍याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडीचालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होत का नाही? आम्ही कोकण पर्यटनाचं मार्केटिंग कधी करणार आहोत? याचा खर्च कोणी करायचा? मध्यंतरी चिपळूणच्या बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारीसाठी आम्ही ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडच्या सहकार्‍यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स केल्या होत्या. डेस्टिनेशन चिपळूण सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला, पण सतत याचा खर्च कोण करणार? हा मुद्दा प्रलंबित राहातो. एका अंदाजानुसार पर्यटन व्यवसायातील 80 टक्के व्यवसाय हा जाहिरातीवर अवलंबून असतो. तर एकूण पर्यटन व्यवसायातील 20 टक्के भाग जाहिरातीवर खर्च केला जातो. कोकणात आमच्या व्यावसायिकांकडून हेही होत असेल का? प्रश्न आहे. कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्य ताकद आहे. यामुळे कोकणातीलसमुद्रकिनारे स्वच्छ आहेत का? पाहावे लागेल. नसल्यास ते स्वच्छ ठेवावे लागतील. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी घरांना होम स्टे केलं आहे. कोकणातील महिला येणार्‍या पर्यटकांना रुचकर जेऊ घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरू असते, पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे.

देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला ‘थीम्स’ भेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारचे, प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. रत्नागिरीसह सिंधुदूर्गात स्कुबा डायव्हिंग सुरु झाले आहे. तिथेही, ‘फार कमी वेळ मिळतो. समुद्र अस्वच्छ आहे’ अशा पर्यटकांच्या तक्रारी ऐकू येतात. यावर आम्हाला उपाय शोधावा लागेल. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या सार्‍यांचे डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. मुळात कमी बजेट असणार्या फिल्म्स करणे ही मोठी कसरत आहे. कोकणात मॅनपॉवर, व्यवस्थापन, जेवणखाणं, निवास या गोष्टी परवडणार्या बजेटमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची स्थिती आजही अपवादात्मक भेटते, असं यातल्या लोकांचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात लो बजेट चित्रपटांची निर्मिती होत असते. कोकणी सौंदर्याला चित्रपटात आणताना याचा विचारही करावा लागेल. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदूर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदूर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. कोकणात मसाल्याचे बेट का होत नाही ? आमच्या कर्नाळा आणि फणसाड या अभयारण्यांची उत्कृष्ट अशी ओळख का नाही ? अ‍ॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरु झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं मार्केटिंग नीटसं झालं तर कोकणात परदेशी पर्यटक येईल.

अख्खं जग सध्या ‘रिव्हेंज टुरिझम’साठी तयार होते आहे. लोकं प्रवासाची रिस्क घेऊ लागलेत. कोकण यासाठी तयार आहे का? कोकणला यासाठी नवीन नीती आणि योजना तयार करावी लागेल. पर्यटकांच्या आरोग्याची नियमित चौकशी,आर्थिक व्यवहार डिजिटल करणे, पर्यटकांचे स्वागत करताना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर वापरणे, जेवताना, वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे, पर्यटन कर्मचार्‍यांनी सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे, पर्यटकांची खोली, हॉल, जेवणाची जागा सॅनिटायझरने स्वच्छ करणे, ऑक्सिमीटर, तापमापन यंत्राने पर्यटकांची तपासणी करणे, उत्पादने विकतानाची काळजी आदी नियम स्वतःवर घालून घ्यावे लागतील. कोकणी माणूस हे करेल यात शंका नाही. पण शासनाने 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग देण्याऐवजी प्रलंबित कोकण विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास महामंडळ द्यावे. थीमबेस्ड कोकणला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी व्यापक विचार करावा. कोकणात राज्याचा आर्थिक विकास सांभाळण्याची शक्ती आहे. संकटे कितीही आली तरी कोकण रडणारा नाही लढणारा आहे. हे कोकणी स्पिरिट इथली संस्कृती आहे. जुलैच्या महापुरात ती दिसली आहे. ती पर्यटनातही दिसण्यासाठी कोकणाचा सर्वसमावेशक विचार झाल्यास इथल्या पर्यटन दिनाचे भविष्य उज्ज्वल आहे.

-धीरज वाटेकर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply