तालुका पत्रकार संघाचा पाठिंबा
माणगाव : प्रतिनिधी
माणगाव बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून या स्थानकाला कोणीच वाली राहिला नसल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या स्थानकात रस्त्यावर जागोजागी मोठमोठे प्रचंड खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यांतून पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. स्थानकात येणार्या बसेस झोला मारत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यांच्या समस्येबाबत माणगाव तालुका भाजपचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी आक्रमक भूमिका घेत तालुका भाजपतर्फे 1 नोव्हेंबर रोजी स्थानकात येणार्या बसेस आडवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या या आंदोलनाला माणगाव तालुका पत्रकार संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेखयांनी सांगितले.
माणगाव हे दक्षिण रायगडातील मध्यवर्ती असे महत्त्वाचे ठिकाण आहे. बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून बसस्थानकासमोर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. या समस्येकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कोणी येथील खड्ड्यांबाबत आवाज उठविल्यास तेवढ्यापुरती डागडुजी करण्यात येते, मात्र चांगल्या प्रकारे हा रस्ता तयार करण्यात येत नाही. आता या प्रश्नाबाबत तालुका भाजपतर्फे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी आक्रमक भूमिका घेत हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या दर्जाचा न केल्यास 1 नोव्हेंबर 2021 रोजी बसेस आडवून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तालुका भाजपतर्फे दिला आहे. भाजपच्या या आंदोलनास तालुका पत्रकार संघाने पाठिंबा दिला असून जोपर्यंत हा रस्ता चांगल्याप्रकारे होत नाही तोपर्यंत काहीही झाले, तरी चालेल आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा भाजप व तालुका पत्रकार संघातर्फे परिवहन महामंडळाला देण्यात आला आहे.