Breaking News

अंधश्रद्धा आणि शिक्षित समाज..!

शिक्षणाने अज्ञान दूर होते, प्रगती होते, खरं-खोट्याची समज निर्माण होते, असा समज होता, मात्र आजच्या समाजाची पद्धती, कर्मठ रुढी, परंपरा, अंधश्रद्धा पाहता हा तर शिक्षणाचा पराजय आहे, असं म्हणावं लागेल. शिकार करणारा मनुष्य जेव्हा शेती करायला शिकला, तेव्हा तो रानटी जीवनाकडून मानवी जीवनाकडे वाटचाल करू लागला. हा त्याच्या प्रगतीचा पहिला टप्पा होता. शिक्षणाने तेव्हाही माणसाची जीवन पद्धती बदलली आणि आजही बदलली आहे. शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात स्थैर्य आलं, सुखं आलं, आरोग्य लाभलं, सामाजिक बांधिलकी निर्माण झाली, पण आजही मनुष्य मागासलेलाच आहे का? मागासलेला हा शब्द या ठिकाणी वापरण्यामागे दुसरे तिसरे कोणते कारण नसून हा विचारांचा मागासलेपणा आहे. धर्म आणि समाजरचना ही पुरातन काळापासून मनुष्याची जीवनपद्धती ठरवत आली आहे. भले जरी धर्मग्रंथ हे मनुष्यानेच लिहिले असले, तरी ते मुठभर लोकांनी अनेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केलेले हे कट कारस्थान आहे. अशिक्षित समाजाला हे कधीच कळले नाही, त्यांनी धर्माचे कायदे समजून त्यांचे तंतोतंत पालन केले. यातून वर्ण आणि जातीव्यवस्था निर्माण झाली. उच्चवर्ण आणि सोशिक असे समाजाचे दोन भाग झाले. मुठभर उच्चवर्णीयांनी धर्माचे कायदे आणि कर्मठ रुढी, परंपरा लादून गरिबांचे, दीनदुबळ्यांचे शोषण केले. शिक्षणापासून वंचित असणारा हा समाज दारिद्री आणि मागासलेपणाच्या खाईत कायमच खितपत पडला होता. आघोरी आणि जाचक परंपरा अमानुष कृत्य करीत होती. नरबळी, नागबळी, सती, बालविवाह, बहिष्कृत समाज, नवस, उपास-तापास, महिलांचे लैंगिक शोषण, चेटूक, काळीजादू या अनेक कारणांनी गोरगरिबांचे शोषण होत आले आहे. हजारो वर्षांच्या रुढी-परंपरा सहजासहजी मिटणे तेवढे सोपे नव्हते. समाजातील या अनिष्ठ परंपरांविरोधात त्याही काळात विचारवंतांनी आपल्या विचारांनी समाज परिवर्तनाचे कार्य केले आहे. महात्मा गौतम बुद्ध, संत बसवेश्वर, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न केला. गौतम बुद्ध आणि संत बसवेश्वर यांनी पीडितांचे शोषण करणार्‍या वैदिक परंपरेलाच छेद दिला. सत्य आणि अहिंसेचा मार्ग दिला, जगभर या विचारांचा प्रसार केला. आज भारताची ओळखही याच महान गौतम बुद्धांमुळे आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. संत बसवेश्वर यांनी एकेश्वराचा मंत्र देत लिंगायत पंथाची स्थापना केली. या लिंगायत पंथात त्यांनी कोणत्याच कर्मकांड आणि रुढी-परंपरेला स्थान दिले नाही. विद्रोही लिखाण करून तुकाराम महाराज यांनी धर्मातील मागास रुढी, परंपरांवर सडकून टीका केली आहे. आपल्या अभंगवाणीमधून समास सुधारण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र त्याच समाजाने त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा खून केला. समाजात सुधारणा कार्यात तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, डॉ. नरेंद्र दाभोळकर अशी अनेक नावे घेता येतील, ज्यांनी आपलं आयुष्य समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी वेचलं, मात्र आज पाहिलं तर त्यांच हे योगदान व्यर्थ गेल्यासारखं आहे. पूर्वी सर्वसामान्यांना शिक्षण घेता येत नव्हतं. त्यांच्या अज्ञानीपणामुळे समाजात कर्मकांड, आघोरी प्रकार चालत होते. महात्मा फुले यांच्यामुळे वंचित समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळाला, तो समाज आज उच्चशिक्षित झाला, पण शिक्षण घेऊनही आजही हा समाज अज्ञानीच राहिला आहे. डोळ्यांवरची धर्माची आणि परंपरांची पट्टी काढून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायला तयार नाही. शिक्षण घेऊनही आजही समाजात अघोरी प्रकार घडत आहेत. ज्याचा आपल्या जगण्याशी काडीमात्र संबंध नाही, असे नागबळी, उपासतापास, व्रतवैकल्ये, पूजापाठ प्रकार करण्यात मनुष्य धन्यता मानत आहे. देवळात देव राहात नाही, देवळात तर पुजार्‍याचे पोट राहते, असं सांगणार्‍या गाडगेबांबांची जन्मतिथी आणि पुण्यतिथी आम्ही साजरी करतो, मग त्यांच्या विचारांचे काय? मनुष्य मेल्यानंतर त्याला स्वर्गात पाठविण्यापर्यंत की, जो स्वर्ग कोणीच पाहिला नाही, त्यासाठी गोरगरिबांना कर्ज काढून विधी करावे लागत आहेत. धर्माचे दलाल नुसत्या उत्तरकार्यासाठी 20-20 हजार रुपये घेत आहेत. हे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे. आजही देवाच्या नावाने बळी देण्यासाठी प्राणीहत्या केली जात आहे. राखणं असो वा गोंधळ असो, पूजा असो वा नागबळी सगळीकडे निष्पाप जीवांची हत्या आणि पैशाची लुटमार होत आहे. लोक शिकले, पण शिक्षित नाही झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला ठेवून केवळ चमत्कारांवर विश्वास ठेवला जात आहे. कोणत्याच मंत्राने साधी सुईच काय पण कोंबडीचे पीसही हलवता येत नाही. हे तितकेच सत्य आहे. भौतिक नियम कोणीही बदलू शकत नाही, तरीदेखील शिकलेले लोक ढोंगी बाबा, महाराजांच्या मागे का लागत आहेत? समाज शिकला, प्रगती झाली, पण जोपर्यंत आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत नाही तोपर्यंत आमच्या शिकण्याला आणि प्रगतीला काहीच अर्थ नाही. -महेश शिंदे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply