फेसबुक आयएनसीचे कॉर्पोरेट नामांतर करण्यात आले असून तिचे नवे नाव मेटा असे असेल. याचा दुसरा अर्थ असा की फेसबुक हे आता मेटाचे प्रॉडक्ट राहील आणि त्याचे नाव फेसबुक हेच असेल. अवाढव्य प्राप्ती, अवाढव्य व्याप्ती आणि त्यातून मिळालेली अमर्याद शक्ती यामुळे फेसबुक गेल्या काही वर्षांत बलाढ्य होत गेले. त्यातूनच डेटा प्रायव्हसी आणि इन्फर्मेशन शेअरिंगच्या मुद्द्यांवर गेली काही वर्षे फेसबुकला सतत आरोपांचा सामना करावा लागत आहे. म्हणून फेसबुकचे रिबॅ्रण्डिंग करण्याचा खटाटोप केला जात आहे, अशी एक गैरसमजूत जगभरात रुजली होती. त्यात तथ्य नाही असे वाटते.
गेल्या दीड दशकामध्ये जगाचा चेहरामोहरा कमालीचा बदलत गेला. याला प्रामुख्याने कारणीभूत होती ती इंटरनेट क्रांती. इंटरनेटचा जन्म हा तसा जुनाच म्हणावा लागेल. 70-80च्या दशकातच इंटरनेट हे संपर्काचे प्रभावी साधन होऊ शकते याची कल्पना शास्त्रज्ञांना आली होती. अर्थात तेव्हा संगणकांचे विश्व अतिशय गुंतागुंतीचे आणि अवाढव्य होते. उदाहरणार्थ आज आपल्या खिशात मावणारा मोबाइल ज्या प्रकारची कामे करतो किंवा जितक्या प्रणाली वापरतो, त्या सर्व गुंतागुंतीच्या इलेक्ट्रॉनिक रचनांसाठी त्या काळी मोठे दालन गरजेचे झाले असते, परंतु नव्या सहस्त्रकामध्ये संपर्काचे मार्ग कमालीचे वेगवान झाले. जनसामान्यांच्या हातात स्मार्ट फोन आले आणि यथावकाश फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसारखी समाजमाध्यमे उपलब्ध झाली. यापैकी फेसबुकचा जन्म मार्क झुकेरबर्ग नावाच्या एका कोवळ्या तरुणाच्या प्रतिभेमुळे झाला. एका छोट्याशा खोलीच्या अंधार्या कोपर्यामध्ये मार्क झुकेरबर्गने फेसबुकला आकार दिला. त्याने आता विश्वव्यापी स्वरूप धारण केले आहे, मात्र तेवढ्यावर तो थांबला नाही. अवघ्या ब्रह्मांडाला गवसणी घालण्याचे त्याचे ध्येय नजीकच्या टप्प्यात आले आहे असे म्हणता येईल. त्यासाठीच फेसबुकने आता आपल्या पालक कंपनीचे नामांतर करण्याचे ठरवले आहे. हे कॉर्पोरेट नामांतर आहे, प्रॉडक्टचे म्हणजे उत्पादनाचे नामांतर नाही हे आधी सर्वांनी समजून घेतले पाहिजे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर असंख्य छोट्या-छोट्या इंटरनेट किंवा टेक कंपनीज यांची एकत्रित मालकी असलेली कंपनी म्हणजे फेसबुक आयएनसी. म्हणजेच फेसबुक आयएनसी ही मुख्य कंपनी एका छत्रीच्या आकाराची मानली, तर त्याखाली इतर छोट्या कंपन्या सामावल्या जातात. जगभरात असे अनेक उद्योग समूह आहेत. अनेक स्टार्ट अप्स सुरुवातीला बॅ्रण्ड आणि प्रॉडक्ट किंवा सेवा यात भेद करत नाहीत. नंतर व्यवसाय मोठा झाला की इतर उपक्रम सुरू केले जातात किंवा सामावून घेतले जातात. अशा वेळी एका स्वतंत्र छत्राखाली आपली उत्पादने किंवा सेवा ठेवणे आवश्यक ठरते. तेच फुसबुकने केले आहे. उदाहरणार्थ गुगल जन्मले 1998 साली, परंतु पालक कंपनी अल्फाबेट आयएनसी हिचा जन्म 2015 साली झाला. फेसबुक आपले वर्तमान आहे तर मेटा आणि मेटाव्हर्स हे आपले भविष्य असणार आहेत. यामध्ये ऑटोमेशन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्चुअल रिअॅलिटी आणि मशीन लर्निंग यावर भर असेल. मेटा या नावातून निर्माण होणारे नवे ब्रह्मांड म्हणजेच मेटाव्हर्स अशी ही संकल्पना आहे. इतकी वर्षे मेटाव्हर्स ही संकल्पना विज्ञान काल्पनिकांमध्ये लोकप्रिय झाली होती. तीच प्रत्यक्षात उतरवण्यात फेसबुक आयएनसीने पुढचे पाऊल टाकले आहे.