Breaking News

स्वागताच्या तुतार्या

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे चतुरस्र नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार अजुन पूर्णत्वाने स्थापन व्हायचे आहे. तरीही या नव्या सरकारच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जल्लोश करताना दिसत आहेत.

आठवडाभरापूर्वी ज्यांना पळपुटे बंडखोर असे हिणवले जात होते, त्या शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी जणु नायकत्व बहाल केले आहे. शिंदे-फडणवीस या जोडीचा नुकताच शपथविधी झाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. पाठोपाठ शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावही प्रचंड मोठ्या मताधिक्याने पारित झाला. कमी काळात घटना इतक्या वेगाने घडल्या की मंत्रिमंडळाची रचना किंवा खात्यांचे वाटप याबाबत चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांना उसंत देखील मिळाली नाही. शपथविधी झाल्यानंतर हे दोन्ही जबाबदार नेते वेळ न वाया घालवता कामाला लागले. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पीकपाणी आढावा आणि अन्य मोठ्या प्रकल्पांच्या संदर्भात गांभीर्यपूर्वक चर्चा करण्यात आली. विशेषत: अडीच वर्षे अडकून पडलेला मुंबईतील मेट्रो कारशेडचा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. मधल्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपापल्या मतदारसंघात जाऊ शकले नव्हते. तसेच गेले दोन आठवडे सुरत, गुवाहाटी, गोवा असे फिरणारे शिवसेनेचे आमदार घरी जाऊ शकले नव्हते. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ही सर्व मंडळी आपापल्या मतदारसंघात गेली. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याच आमदारांना माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मतदारांच्या नजरेला नजर कशी भिडवणार? कडेकोट बंदोबस्तात हॉटेलमध्ये किती वास्तव्य करणार, असे प्रश्न विचारले होते. शिवसेनेत उठाव करणार्‍या या आमदारांचे त्यांच्या मतदारसंघात एवढे प्रचंड स्वागत झाले हे आता डोळे भरून पाहणे भाग आहे. उठाव करणार्‍या आमदारांना जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागेल अशीच ठाकरे समर्थकांची अटकळ होती. तसे बोलले देखील जात होते. परंतु प्रत्यक्षात ती अटकळ नसून इच्छा होती हे आता त्यांच्या लक्षात आले असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या ठाणे शहरात अभूतपूर्व स्वागत झाले. रात्री उशीरापर्यंत ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळापाशी जल्लोश सुरू होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी नागपूर गाठले. विमानतळ ते त्यांचे निवासस्थान एवढे लांब अंतर फडणवीस दाम्पत्याची शानदार मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी हजारो भाजप कार्यकर्त्यांचा जमाव जमला होता. “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, ओक्केमध्ये आहे” या डायलॉगमुळे राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धी लाभलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आणखी एक नेते संदिपान भुमरे यांचे औरंगाबाद विमानतळावर तसेच प्रचंड स्वागत करण्यात आले. अडीच वर्षाच्या कालखंडानंतर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला हवे असलेले सरकार अखेर सत्तेवर आल्याची भावना या स्वागत सोहळ्यांमधून स्पष्टपणे दिसून येत होती. अर्थात स्वागताचे हारतुरे लवकरात लवकर आटोपते घेऊन कामाला लागण्याची जबाबदारी नव्या सरकारवर आली आहे. ती ते व्यवस्थित पार पाडतील याची जनतेला खात्री वाटते. स्वागताच्या तुतार्‍यांचा तोच अर्थ आहे. महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’ आले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply