केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे जेएनपीटीतील सागरी वाहतूकीसंदर्भात मत
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग व आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी (दि. 13) जेएनपीटी बंदरात भेट दिली. भेटीदरम्यान सोनोवाल यांनी बंदराच्या कामकाजाची, बंदरातील पायाभूत सुविधांची तसेच बंदराने केलेल्या तांत्रिक प्रगतीची माहिती घेतली. या वेळी त्यांनी जेएनपीटीमधील सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे बंदराच्या कामकाजाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्याबरोबरच बंदरामध्ये नवीन पायाभूत सुविधा विकसित होतील, असे मत मांडले.
सोनोवाल यांनी सार्वजनिक-खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे जेएनपीटी बंदराने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला व जेएनपीटीच्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधला. या वेळी आमदार महेश बालदी, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे स्वागत केले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
सोनोवाल म्हणाले की, सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे देशाच्या प्रगतीमध्ये कसे परिवर्तन होवू शकते आणि देशाचा विकास कसा गतिमान होवू शकतो याविषयी माहिती दिली. जगातील बहुतेक सर्व व्यापार हा समुद्रमार्गे होतो व बंदरे ही संपूर्ण उपखंडातील व देशांतर्गत वाहतूक नेटवर्क (म्हणजे रस्ते, रेल्वे, अंतर्देशीय जलमार्ग) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणारी महत्त्वाची केंद्रे आहेत. म्हणून, जेएनपीटी मधील सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे एक सशक्त व प्रभावी सागरी वाहतूक पायाभूत सुविधा विकसित होण्यास मदत होईल जी देशाच्या आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा घटक असेल. जेएनपीटी मधील सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे बंदराच्या कामकाजाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्याबरोबरच बंदरामध्ये नवीन पायाभूत सुविधा विकसित होतील.
सोनोवाल यांनी जेएनपीटीने केलेल्या आयात-निर्यात व्यापार केंद्रित उपाययोजना व सुलभ दळणवळणासाठी केलेल्या जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देशातील बंदर आधारित औद्योगिक विकासासाठी कशाप्रकारे दिशादर्शक ठरल्या आहेत व त्यामुळे जेएनपीटी हे कशाप्रकारे व्यापार वर्गाचे पहिल्या पसंतीचे बंदर बनले आहे याचा विशेष उल्लेख केला. सोनोवाल पुढे म्हणाले, जेएनपीटी आपल्या कामकाजामध्ये सातत्यपूर्ण तांत्रिक प्रगती आणि बहुविध पायाभूत सुविधां विकसित करुन देशाच्या बंदर आधारित औद्योगिक विकासाचे नेतृत्व करेल व 2030पर्यंत एक मेगा पोर्ट म्हणून विकसित होईल.
जेएनपीटीने नुकतीच सुरू केलेली ’ड्वार्फ कंटेनर ट्रेन’ सेवा, वाढवण बंदराची सद्यस्थिती तसेच जेएनपीटीच्या इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसह ‘व्यवसाय सुलभीकरणासाठी’ जेएनपीटीने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती जेएनपीटीच्या अधिकार्यांनी मंत्री महोदयांना दिली.
सोनोवाल यांनी करल जंक्शन येथे जेएनपीटी पोर्ट रोड काँक्रिटीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले आणि जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझातील अत्याधुनिक सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी पार्किंग प्लाझाच्या कमांड सेंटरला भेट दिली. जीटीआय हाऊसमधील टर्मिनल कामकाजाचा आढावा घेतला जहाजावर जाऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर जेएनपीटीच्या बहु-उत्पादन सेझ आणि हिंद टर्मिनल सीएफसला भेट दिली. तसेच बीएमसीटीपीएल ने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट पोर्ट इनिशिएटिव्ह’चा व दुसर्या टप्प्यातील विस्ताराच्या प्रगतीचा आढावा घेतला.
जेएनपीटी हे देशाच्या सागरी क्षेत्रासाठी प्रमुख प्रेरक राहिला आहे; मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याने आणि प्रोत्साहनाने, भारताच्या निर्यात क्षमतेचा आणि सागरी अर्थव्यवस्थेचा फायदा घेऊन आम्ही निश्चितपणे आम्ही आमच्या विकासाचा आलेख चढताच ठेवू.
-संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी