कराची ः वृत्तसंस्था
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसर्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर टीका केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानच्या पराभवाला काही ठराविक खेळाडू कारणीभूत असल्याची चर्चा रंगत असताना इमरान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांच्या ट्विटचीही चर्चा रंगली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान इमरान खान यांची जिद्द पाकिस्तानच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे. सेमीफायनलमधील पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतर पंतप्रधान इमरान खान खेळाडूंच्या बचावासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून संघातील खेळाडूंच्या पाठिशी असल्याची भावना व्यक्त केली. पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक राहिली. विजय-पराजय हा खेळाचा भाग असतो, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी संघाला धीर दिला.पाकिस्तान संघाचा पराभव झाल्यानंतर इमरान खान यांच्या माजी पत्नी रेहम खान यांनी ट्विट केले. यात त्यांनी थेट इमरान खान यांना टोला लगावला. खान साब… तुम्ही फायनल सामना पाहण्याची इच्छा व्यक्त उगाच केली. तुम्हाला असे करू नका असे म्हटले होते. तुम्ही फायनल पाहण्यासाठी तयार झाल्यामुळेच पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्येच आउट झाला, असा अजब तर्क रेहम खान यांनी लावला आहे. पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहचला तर फायनल पाहण्यासाठी दुबईला जाईन, असे इमरान खान यांनी म्हटले होते. याचाच संदर्भ देत त्यांच्या माजी पत्नी रेहम यांनी त्यांना सुनावले आहे.