बालदिनी सुरू झाला उपक्रम
कर्जत : बातमीदार
आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबं वीटभट्टी कामगार म्हणून स्थलांतरण करतात, त्यामुळे त्या आदिवासी कातकरी यांच्या मुलांचे शिक्षण थांबते. अशा मुलांनी शिकले पाहिजे यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका भगवान जामघरे ही तरुणी त्या मुलांसाठी शाळा सुरू करून शिकवणी वर्ग घेणार आहे. आज बालदिनी वीटभट्टीवरील मुलांची शाळा वीटभट्टीवरच सुरू झाली असून 25 मुले त्या शाळत येऊ लागली आहेत.
वीटभट्टी कामगार हे दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर स्थलांतरण करीत असतात. त्या वेळी त्या कामगारांसोबत त्यांची मुलेदेखील स्थलांतरित झालेली असतात. मग आठ महिने वीटभट्टीवर हे कामगार राहत असल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण आठ महिने बंद असते. त्यात नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत हे कामगार घराबाहेर असतात. नेरळ येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असलेल्या भाविका भगवान जामघरे या विद्यार्थिनीला त्या वीटभट्टीवरील मुलांनीही शिकले पाहिजे असे वाटले. यासाठी शिकवणी वर्ग सुरू करण्याचा हट्ट तिने आपल्या वडिलांकडे धरला.
नेरळ एसटी स्टॅन्ड येथे रिक्षाचालक असलेले भगवान जामघरे यांनी आपल्या तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नातून वीटभट्टीवरील मुलांच्या शाळेसाठी पाटी पेन्सिल घेऊन दिल्या आणि आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस देशात बालदिन म्हणून साजरा होत असताना वीटभट्टी मुलांची शाळा सुरू झाली.
नेरळजवळील दामत येथील वीटभट्टी मालक बाबू नजे आणि फैजल खोत यांनी आपल्या वीटभट्टीवरील सर्व शाळाबाह्य मुले यांना एकत्र करण्यासाठी मदत केली. त्या मुलांच्या शाळेसाठी नजे यांनी एक खोलीदेखील उपलब्ध करून दिली आहे. त्या मुलांना आठवड्यातून दोन दिवस भाविका जामघरे शिकवणार आहे. भाविकाच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात असून एप्रिल 2022 पर्यंत सर्व मुलांना ती शिकवणार आहे. ममदापूर भागात आणखी दोन वीटभट्ट्या असून तेथील मुलांना देखील एकत्र आणून शिकविण्याचा तिचा प्रयत्न आहे, अशी माहिती रिक्षाचालक असलेले तिचे वडील भगवान जामघरे यांनी दिली.
दरम्यान, आपल्या शिक्षणातून वेळ काढून शिकविण्याचा घ्यास घेतलेल्या भाविका जामघरे हिचे कौतुक कर्जत तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिवरे यांनी केले आहे. आपण लवकरच त्या शाळेला भेट देऊन अशा मुलांना कशा पद्धतीने शिक्षण दिले पाहिजे याचे मार्गदर्शन भाविकाला करणार असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी हिवरे यांनी दिली.