315 गावे-वाड्यांना टँकर्सद्वारे जलपुरवठा
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण बनले आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त 315 गावे आणि वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स तसेच अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
उरण तालुक्यातील पाच वाड्यांमध्ये दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील एक गाव व एक वाडीची तहान एका खासगी टँकरद्वारे भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. खालापूर तालुक्यातील 10 गावे व 18 वाड्यांना तीन खासगी टँकर व दोन अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेण तालुक्यातील 15 गावे व 89 वाड्यांसाठी तीन खासगी टँकर्स व एका मदतीच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील चार गावे व तीन वाड्यांना सामाजिक संस्थेच्या एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील 16 गावे व 107 वाड्यांसाठी 10 खासगी टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील 14 गावे व 23 वाड्यांची तहान दोन खासगी टँकर व दोन अधिग्रहित विहिरींच्या पाण्याद्वारे भागविली जात आहे, तर तळा तालुक्यातील सात गावे व दोन वाड्यांना एका खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अशा प्रकारे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एकूण 67 गावे आणि 248 वाड्यांना 22 खासगी, सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन असे 24 टँकर्स आणि चार अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली.