![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2021/11/tomato-1024x768.jpg)
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलच्या बाजरपेठेत इतर भाजीपाल्याच्या तुलनेत लालेलाल टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असलेल्या टोमॅटोने तब्बल 80 ते 90 रुपये प्रतिकिलोपर्यंत उडी मारली आहे.
थोड्याच दिवसात थंडीचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. मेथी, पालक, वांगी फ्लॉवरची आवक अधिक आहे. जेवणात विविध पदार्थ बनवताना त्यात चवीसाठी टोमॅटोची आवश्यकता असते. हिवाळ्यात गरमागरम टोमॅटो सूपसोबत टोस्टचे तुकडे खाण्याची मज्जाच काही और असते. तसेच टोमॅटोची चटणीही, सलाड अनेकजण आवडीने खातात. याचबरोबर मांसाहारी जेवणाला आंबटपणा येण्यासाठी हमखास टोमॅटो वापरला जातो. एकूणच टोमॅटोशिवाय खाना खजाना पूर्ण होत नाही. त्यामुळे शाकाहारी व मांसाहारीसह विविध पदार्थांचा अविभाज्य घटक असणार्या टोमॅटोचे दर अचानकपणे अधिकच वाढल्याने या लाल बादशहावर ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत.
मागील महिन्यापर्यंत टोमॅटो वगळता कोथिंबीर, गवार यासह इतर भाजीपाल्यांचे दर अधिकच वाढले होते. बाजारपेठेत मालाची आवक घटल्याने भाजीपाला महागला असल्याचे होलसेल व्यापार्यांनी त्यावेळी सांगितले, परंतु बाजारपेठेत माल येण्यास सुरुवात झाल्यामुळे आता मेथी, पालक, फ्लॉवर ढिगाने विकले जात आहेत. त्याउलट स्थिती टोमॅटोची आहे. टोमॅटोची आवक कमी झाली आहे. परिणामत: अचानकपणे झालेली दरवाढ ग्राहकांना आश्चर्यचकीत करीत आहे.
सध्या होलसेल बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. किरकोळ भाजी विक्रेत्यांना वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून भाज्या आणणे परवडत नाही. काही दिवसांपूर्वी 40 ते 50 रुपयांना टोमॅटोची विक्री केली जात असते. परंतु अचानकपणे टोमॅटोच्या दरात वाढ झाल्यामुळे आता सुमारे 80 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे.
-सोनाली जाधव, भाजीविक्रेत्या, पनवेल